🔥वर्ध्यात हरिष इथापेंच्या तालमीत गिरविले होते अभिनयाचे धडे.
वर्धा -/भारतीय रंगभूमीवर गेल्या काही वर्षांत विशेष लक्षवेधी ठरलेली नाट्य चळवळ म्हणजे वर्ध्याचे ॲग्रो थिएटर. कलावंत घडवणारी रंगफॅक्टरी म्हणूनच देशात ॲग्रो थिएटरची ओळख आहे. मागील पंधरा वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यातील युवक – युवती नैसर्गिक अभिनय शैलीचे धडे गिरवायला हरिष इथापे संचालित ॲग्रो थिएटर, वर्धा येथे येतात. देशातील नामवंत नाट्य प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशित होण्याकरिता पूर्वपरीक्षेच्या निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागते. या परीक्षेच्या तयारीकरितादेखील अनेक कलावंत ॲग्रो थिएटरला येतात. नागपूरचा आदित्य धनराज अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन 2017ला प्रसिद्ध नाट्य – सिने दिग्दर्शक हरिष इथापे यांच्या ॲग्रो थिएटरला आला. अभिनयाची पूर्वतयारी केली आणि लखनऊ येथील भारतेन्दु नाट्य अकादमी येथे त्याची निवड झाली. राजपाल यादव, नवाझुद्दीन सिद्धिकी सारख्या दिग्गज कलाकारांनीदेखील याच अकादमीमधून प्रशिक्षण धेतले आहे. आदित्यने आपल्या स्वप्नाला आपले ध्येय बनवले. आदित्यसाठी त्याचे ध्येय गाठणे सोपे नव्हते. कारण त्याच्या कुटुंबाला कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नव्हती. तसेच या क्षेत्राबद्दल काहीच माहितीपण नव्हती.ॲग्रो थिएटरमधला कठीण सराव आणि हरिष इथापे यांच्या मार्गदर्शनामुळे हे सर्व शक्य झाले. त्याने नागपुरातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले. अभिनेता व्हायचे स्वप्न उराशी बाळगणा-या आदित्यने नाट्य अकादमीत तीन वर्षांचे शिक्षण पूर्ण करून मुंबईला जाण्याचा निर्णय धेतला. 2022 मध्ये आदित्य मुंबईला पोहचला. सततच्या मेहनतीनंतर आदित्यला त्याच्या आयुष्यातील पहिला मराठी चित्रपट “बंजारा”मध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम मिळाले. हा चित्रपट 16 मे 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भरत जाधव, सुनील बर्वेसारखे दिग्गज कलाकारदेखील आहेत.
आदित्यच्या या यशाने ॲग्रो थिएटरचे महत्त्व परत एकदा सिद्ध झाले आहे. हरिष इथापे, संजय इंगळे तिगावकर, चैतन्य आठले, सुहास नगराळे, गोरल पोहाणे, रसिका मुळे, आर्या भोयर, संहिता इथापे यांच्यासह सर्वच स्तरांतून आदित्यवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.