अनुसुचित जमातीच्या मुलांसाठी मोफत वाहन चालकाचे प्रशिक्षण
प्रतिनिधी / वर्धा :
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत अनुसुचित जमातीच्या मुलांना वाहन चालकाचे प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांनी 27 डिसेंबर पासुन विहित नमुन्यात अर्ज सादर करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाने केले आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार अनुसुचित जमातीचा असावा. त्यांचेकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष असावे, त्याचे शिक्षण एसएससी उत्तीर्ण असावे. उमेदवाराने अर्ज करतेवेळी परिवहन कार्यालयाकडून शिकाऊ परवाना घेतलेला असावा.उमेदवारास कोणतेही शारिरीक व्यंग नसावे, ज्यामुळे वाहन चालवितांना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होईल. पात्र लाभार्थ्यांनी वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रासह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, व आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह (नविन) येथे अर्ज सादर करावा, असे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दिपक हेडाऊ यांनी कळविले आहे.