हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेवत राजपालचा अवैध डिझेल-पेट्रोल विक्रीचा गोरखधंदा
सचिन धानकुटे/ सेलू:
येथील राजपाल नामक डिझेल-पेट्रोल तस्कराच्या हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपावरुन चोरीच्या डिझेल-पेट्रोलची खुलेआम विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. सदर प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून दिवसाढवळ्या होणाऱ्या या तस्करीला संबंधित अधिकाऱ्यांसह अनेकांचा आशिर्वाद असल्याचे बोलले जात आहे.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, केळझर व खडकी परिसरात अवैध डिझेल-पेट्रोल खरेदी-विक्रीचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. केळझर येथील हायवेलगतच्या एका पानठेल्याच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात चोरीच्या डिझेलची खरेदी केली जाते. त्यानंतर ते डिझेल राजपालच्या अधिकृत टँकरमधून हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपावरील टाक्यात ओतले जाते. तेथूनच या अवैध डिझेल-पेट्रोलची राजरोसपणे विक्री केली जात आहे. दिवसाढवळ्या होणारा हा डिझेल तस्करीचा खुलेआम कार्यक्रम अनेकांच्या नजरेत भरतो. परंतु संबंधित अधिकारी व विभागाच्या डोळ्यावर लक्ष्मीची झापड आल्याने त्यांचे मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.
सदर डिझेल तस्करीसाठी राजपालने एका खास टँकरची सुद्धा व्यवस्था केली असून तो टँकर हा सदैव पंपावरच उभा असतो. सदर प्रकार हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून राजरोसपणे सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे या डिझेल तस्करीच्या गोरखधंद्यात हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा तर हात नाही ना..! अशीही शंका उपस्थित होत आहे. या प्रकारा संदर्भात स्थानिक अधिकारी व विभागाला सुद्धा कल्पना असल्याचे दिसून येते. परंतु मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार तरी कोण..? त्यामुळे राजपालचा हा अवैध डिझेल-पेट्रोल विक्रीचा गोरखधंदा चांगलाच तेजीत आला आहे.