🔥सेवाग्राममध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ. वॉटर फिल्टर बसवण्याची अंतिम मागणी; नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद
सेवाग्राम -/ परिसरातील नागरिकांनी शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या अत्यंत गरजेची जाणीव लक्षात घेऊन आर.ओ. वॉटर फिल्टर व संपूर्ण संच बसविण्याची अंतिम मागणी माननीय खासदार अमरदादा काळे यांच्याकडे केली आहे.ही मागणी कु. तेजश्री शांताराम पदीले यांच्या वतीने लेखी स्वरूपात करण्यात आली असून, गावातील नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेता या योजनेवर तात्काळ कार्यवाही व्हावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
सेवाग्राममध्ये गेल्या काही महिन्यांपासून शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्थानिक जलस्रोतांमधून होणारा पुरवठा अपुरा आणि अनेकदा दूषित असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे गावात आर.ओ. वॉटर फिल्टर यंत्रणा व संपूर्ण संच बसविणे अत्यावश्यक झाले आहे. या मागणीला गावकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून, पाण्याचे शुद्धीकरण, योग्य वापर, आरोग्य संरक्षण आणि पाण्याच्या साठवणूक व्यवस्थेसाठी ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. कु. तेजश्री शांताराम पदीले यांनी या विषयासाठी सातत्याने पाठपुरावा करत खासदार श्री. अमरदादा काळे यांच्याशी संपर्क साधला असून, लवकरच ही योजना कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या सकारात्मक उपक्रमामुळे गावात आरोग्यदृष्ट्या चांगले वातावरण निर्माण होईल आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाईल.