बनावट जन्म दाखल्यांचे आंतरराज्य रॅकेट उद्ध्वस्त (बिहार, युपी आणि एमपीमधून ४ आरोपींना अटक…..

0

🔥बनावट जन्म दाखल्यांचे आंतरराज्य रॅकेट उद्ध्वस्त
(बिहार, युपी आणि एमपीमधून ४ आरोपींना अटक)

​यवतमाळ -/ शासकीय पोर्टलचा गैरवापर करून बनावट जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रे तयार करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य सायबर टोळीचा पर्दाफाश करण्यात यवतमाळ पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण ८ आरोपींना बेड्या ठोकल्या असून, ताजी कारवाई बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांतून करण्यात आली आहे. केवळ १४०० लोकसंख्या असलेल्या एका ग्रामपंचायतीच्या नावावर चक्क २७ हजारहून अधिक जन्म नोंदी झाल्याचे धक्कादायक वास्तव या तपासातून समोर आले आहे.
​​या प्रकरणाची सुरुवात १६ डिसेंबर २०२५ रोजी झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा जन्म-मृत्यू निबंधक डॉ. सुभाष शहाजी ढोले यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील ‘शेदुंरसणी’ (ता. आर्णी) या ग्रामपंचायतीच्या पोर्टलच्या लॉगिनचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले होते.
​सप्टेंबर २०२५ ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीत या पोर्टलवर तब्बल २७,३९७ जन्म नोंदी आणि ७ मृत्यू नोंदी आढळल्या होत्या. विशेष म्हणजे, या ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्या जेमतेम १४०० आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या नोंदींमुळे संशय बळावला आणि तांत्रिक तपासानंतर हे बनावट जन्म प्रमाणपत्रांचे मोठे रॅकेट असल्याचे स्पष्ट झाले.​गुन्ह्याचे गांभीर्य आणि तांत्रिक गुंतागुंत लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता यांनी या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्याकडे सोपवला. तपासादरम्यान असे दिसून आले की, केवळ शेदुंरसणीच नव्हे तर ‘भवानी’ (जि. यवतमाळ) या ग्रामपंचायतीच्या पोर्टलमध्येही अनधिकृत प्रवेश करून बनावट दाखले तयार केले जात होते.
​तांत्रिक पुराव्यांच्या आधारे, यवतमाळ पोलिसांनी दोन विशेष पथके तयार केली. सपोनि श्रीकांत जिंदमवार आणि पोउपनि सागर भारस्कर यांच्या नेतृत्वाखालील या पथकांनी परराज्यात छापे टाकून चार मुख्य आरोपींना अटक केली यामध्ये आरोपी ताबीश असगर अली (२७ वर्षे, रा. मोतीहारी, बिहार ,संतोष रमाशंकर गुप्ता (२३ वर्षे, रा. देवरिया, उत्तर प्रदेश), प्रसुन प्रेमनारायण कुमावत (२२ वर्षे, रा. धार, मध्य प्रदेश), शरद श्यामसुंदर जायस्वाल (२५ वर्षे, रा. धार, मध्य प्रदेश) ​यांच्याकडुन गुन्ह्यात वापरलेले मोबाईल, लॅपटॉप आणि इंटरनेट राऊटर असे तांत्रिक साहित्य जप्त केले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २० जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती लोकांचा सहभाग आहे आणि त्यांनी आतापर्यंत किती जणांना बनावट दाखले विकले, याचा तपास पोलीस करत आहेत.
​ही मोठी कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी दिनेश बैसाणे, पोनि. यशोधरा मुनेश्वर, सपोनि श्रीकांत जिंदमवार, पोउपनि सागर भारस्कर आणि त्यांच्या पथकातील गजानन कोरडे, अन्सार बेग, मिलिंद दरेकर, विशाल भगत, मोहम्मद भगतवाले, पवन नांदेकर, विकास कमनर, प्रविण उईके, अजय निंबाळकर, सारंग शेंडे, आकाश खेत्रे, अभिनव बोंद्रे आणि पुजा भारस्कर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ-वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!