🔥कोयत्याने वार करून इसमाची निर्घृण हत्या आरोपी जेरबंद.
झरी जामणी -/ तालुक्यातील शिबला येथे महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करत असलेल्या संतोष मानकू टेकाम (वय ४६) यांची कोयत्याने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेजाऱ्यांतील किरकोळ वादातून ही रक्तरंजित घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे तीन वाजताच्या सुमारास टेकाम हे घरासमोरील अंगणात तूराट्याच्या काड्यांचा मांडव उभारून भगवान शंकराच्या प्रतिमेसमोर पूजा करत होते. त्याचवेळी शेजारी राहणारा शालिक सिताराम आत्राम याने धारदार कोयत्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात टेकाम यांचा गळा चिरण्यात आला तसेच दोन्ही हातांवर गंभीर वार करण्यात आले. उजवा हात अंशतः तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. या भीषण हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
आरडाओरड ऐकून धाव घेतलेल्या टेकाम यांच्या पत्नीने पतीला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र झटापटीदरम्यान त्या देखील जखमी झाल्या. त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय, पांढरकवडा येथे दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.
घटनेनंतर आरोपी शालिक सिताराम आत्राम हा कुटुंबासह पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, घटनेपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर माथार्जुन बाजार परिसरात पोलिस अंमलदार सचिन गाडगे यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार मिलिंद सरकटे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असून फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत पुढील तपास सुरू आहे.
मृत टेकाम यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी अशी दोन लहान मुले आहेत.
या घटनेमुळे शिबला परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.