साहुर -/विदर्भ मराठवाडा डेअरी डेवलपमेंट प्रोजेक्ट (VMDP) च्या टप्पा-२ अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या दुग्धविकास योजनेत पशुपालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. VMDDP चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तीन प्रमुख पुरवठादारांवर संगनमताने शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याचा गंभीर आरोप वर्धा जिल्ह्यातील संतप्त पशुपालकांनी केला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी भरलेले लाखो रुपये धोक्यात असून, शासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
🔥काय आहे प्रकरण?
VMDDP च्या टप्पा-२ अंतर्गत उच्च दूध उत्पादन क्षमता असलेली एक गाय किंवा म्हैस पशुपालकांना वाटप करण्याची योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी दोन ते तीन महिन्यांपूर्वीच नियमानुसार ५०,००० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट (DD) VMDDP कडे जमा केला होता. त्यांना शासनाकडून ५०% अनुदान म्हणजेच ५०,००० रुपये मिळतील, असे सांगण्यात आले होते. तसेच, डीडी जमा केल्यापासून १५ दिवसांच्या आत पशु मिळतील असे आश्वासनही दिले होते.
🔥फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस.
परंतु, तीन महिने उलटूनही पशु न मिळाल्याने संतप्त पशुपालकांना काल, दि. २५/०३/२०२६ रोजी पशु निवडीसाठी वर्धा जिल्ह्यातील एका ठिकाणी बोलावण्यात आले. वर्ध्यातून सुमारे ३५ पशुपालक वेगवेगळ्या गावांहून आशेने पुरवठादारांच्या ठिय्यावर पोहोचले. मात्र, तिथे केवळ ९ पशु पसंतीसाठी उपलब्ध होते. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या उच्च दूध उत्पादन क्षमतेच्या पशुंची अपेक्षा पशुपालकांना होती, त्यापैकी एकही पशु तिथे नव्हता. जे काही पशु होते, ते कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त होते आणि त्यांची किंमत बाजारभावापेक्षा ३० ते ३५ हजार रुपये अधिक होती.
🔥अधिकारी आणि पुरवठादारांची ‘मनमानी’
पशु पुरवठादारांनी (श्री. किशोर डुकरे, रा. वर्धा; श्री. मोहम्मद शकील अब्दुल मजीद शेख, रा. नागपूर; श्री. किशोर ठाकूर, रा. वर्धा) पशुपालकांशी उद्धटपणे संवाद साधत “घ्यायच असेल तर घ्या” असे सांगितले. या प्रकाराने हवालदिल झालेल्या पशुपालकांनी VMDDP चे प्रोजेक्ट डायरेक्टर यांचे OSD श्री. पाटील साहेब,यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता, त्यांनीही “घ्यायचे असल्यास घ्या, नाहीतर तुमचा डीडी परत करतो,” असे बेजबाबदार उत्तर दिले. या उत्तराने पशुपालकांचा संताप अनावर झाला.
पशुपालकांनी आरोप केला आहे की, VMDDP मुख्य कार्यकारी अधिकारी आणि हे पुरवठादार संगनमताने आपली मनमानी करत आहेत. पुरवठादार निकृष्ट दर्जाचे पशु कमी किमतीत आणून ते बाजारभावापेक्षा खूप जास्त किमतीत विकून आपला खिसा भरत आहेत, तर अधिकारीही यात सामील आहेत. साधारण शेतकऱ्याला या त्रासाचा मोठा फटका बसत आहे. पशु निवडीसाठी १००-१३० किलोमीटरचा प्रवास करूनही पशुपालकांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागले, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैशांचा अपव्यय झाला.
🔥पशुपालकांच्या प्रमुख मागण्या: वर्धा जिल्ह्यातील ५४ पशुपालकांनी (ज्यात १ साहिवाल गाय आणि ५३ म्हशींसाठी डीडी जमा केले आहेत) शासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत: १. पशु खरेदीसाठी खुले बाजारातून खरेदी करण्याची मुभा द्यावी. २. किंवा, योजनेची संपूर्ण अनुदान रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावी. ३. प्रकल्पातून पुरवठादारांना पूर्णपणे वगळण्यात यावे. ४. संबंधित पुरवठादारांवर तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी.
या फसवणुकीमुळे लाखो रुपयांचा डीडी जमा केलेल्या पशुपालकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना शासनाकडून तातडीने न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पशुपालकांनी दिला आहे.