🔥प्रशासकीय वरदहस्तामुळे निसर्गाचा ‘बळी’ आणि शेतकऱ्यांची ‘होळी’
🔥जिल्हाधिकारी विकास मिना साहेब, आता तरी ‘साहसिक’ पाऊल उचलणार का?
यवतमाळ -/महाराष्ट्राच्या मातीतून कोट्यावधींची खनिजे उपसायची, शासनाचा महसूल बुडवायचा आणि स्थानिक गरिबांच्या पाचवीला पूजलेलं मरण अधिक गडद करायचं, असा एककलमी कार्यक्रम सध्या अडेगाव परिसरात सुरू आहे. ‘ईशान मिनरल्स’ या कंपनीच्या मुजोरीने अडेगावचे ग्रामस्थ अक्षरशः होरपळून निघाले आहेत. दै. ‘साहसिक’ने या अन्यायाला वाचा फोडल्यानंतर आता खळबळ उडाली असून, कंपनीचा सर्वेसर्वा अरिहंत अग्रवाल याने ‘ब्र’ काढायलाही जागा उरलेली नाही. मात्र, या सर्व प्रकरणाचा खरा सूत्रधार ‘लाचखोर’ खनिकर्म अधिकारी संजय जोशी असल्याचे बोलले जात असून, त्याच्याच आशिर्वादामुळे अग्रवालने अडेगावची वाट लावली आहे.
ईशान मिनरल्समधून उडणाऱ्या विषारी धुळीने अडेगावच्या शिवाराला पांढऱ्या कफनात वेढले आहे. हिरवीगार पिके धुळीखाली गाडली जात असून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.
नवनाथ महादेव क्षीरसागर या शेतकऱ्याची व्यथा ऐकून पाषाणालाही पाझर फुटेल. गेल्या ११-१२ वर्षांपासून त्यांच्या पिकांचे नुकसान होत असतानाही कंपनीने त्यांना दमडीचीही मदत केलेली नाही.
३ लाख ३० हजार रुपयांची थकबाकी आणि वार्षिक ६० हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी या मायबाप शेतकऱ्याला आज उपोषण मंडपात बसावे लागत आहे, ही लोकशाहीसाठी लाजिरवाणी बाब आहे.
नियम धाब्यावर बसवून बफर झोनमध्ये बेकायदेशीर उत्खनन करण्याचा सपाटा ईशान मिनरल्सने लावला आहे. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी असलेले नियम या कंपनीसाठी केवळ कागदावरच उरले आहेत.
सर्वात गंभीर बाब म्हणजे ‘डी-वॉटरिंग’! ८० फुटांच्या खाली बेसुमार पाणी उपसा केल्यामुळे परिसरातील भूजल पातळी रसातळाला गेली आहे. अडेगावच्या विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. गावाचा पाणी प्रश्न गंभीर करून स्वतःची तिजोरी भरणार्या या कंपनीला लगाम घालणार कोण?
लाचखोर संजय जोशींचे ‘कवच’ आणि अग्रवालची ‘चुप्पी’ खनिज कर्म विभागाचे अधिकारी संजय जोशी यांच्यावर लाचखोरीचे आरोप होत असतानाच, त्यांनी ईशान मिनरल्सच्या बेकायदेशीर कृत्यांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचे स्पष्ट दिसत आहे. जेव्हा एखादा अधिकारी भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतलेला असतो, तेव्हाच अरिहंत अग्रवाल सारखे उद्योजक निर्ढावतात. शासनाच्या तिजोरीवर कोट्यावधींचा दरोडा टाकला जात असताना खनिकर्म विभाग मूग गिळून का बसला आहे? अग्रवालची ही ‘चुप्पी’ म्हणजे गुन्ह्याची कबुलीच नाही का?
ग्रामस्थांच्या या लढ्याला आता राजकीय बळ मिळाले आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी सहकाऱ्यांसह उपोषण मंडपाला भेट देऊन कंपनीला थेट इशारा दिला आहे.
”अडेगावच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत कंपनीला मोजावी लागेल. जर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला नाही, तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून हे साम्राज्य उखडून टाकेल,” अशा शब्दांत खाडे यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले.
यावेळी तेजराज बोढे, मोहन पानघाटे, नितेश ठाकरे यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या ज्यावर निर्णय होणे अनिवार्य आहे:
१. तात्काळ पुनर्भरण: उत्खनन केलेल्या परिसराचे शास्त्रीय पद्धतीने पुनर्भरण करण्यात यावे.
२. डी-वॉटरिंगवर बंदी: ८० फुटांखालील पाण्याचा उपसा त्वरित थांबवण्यात यावा.
३. प्रदूषण नियंत्रण: रस्त्यावर दररोज वॉटर टँकरद्वारे पाणी मारून धूळ थांबवण्यात यावी.
४. थकीत नुकसान भरपाई: नवनाथ क्षीरसागर यांच्यासह सर्व बाधित शेतकऱ्यांना व्याजासह भरपाई मिळावी.
५. बफर झोनचे रक्षण: बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावेत.
एकीकडे सर्वसामान्य माणूस नियमांच्या जाळ्यात अडकतो आणि दुसरीकडे ईशान मिनरल्स सारख्या कंपन्या प्रशासनाला खिशात घेऊन फिरतात, असा समज जनमानसात दृढ होत आहे. जिल्हाधिकारी विकास मिना यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून भ्रष्ट खनिकर्म अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि अडेगावच्या भूमीला या प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करावे, हीच आता संपूर्ण जिल्ह्याची मागणी आहे.(क्रमशः)