🔥”अरुंद रस्ते आणि अतिक्रमणामुळे आर्णीची बाजारपेठ गुदमरली;पार्किंग सुविधेसाठी नगर परिषदेने पाऊल उचलण्याची गरज!”
आर्णी -/ आर्णी शहरातील मुख्य बाजारपेठ आणि वर्दळीच्या रस्त्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगर परिषदेने आगामी सभेत विशेष प्रस्ताव मंजूर करून पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
शहरातील पाणीची टाकी परिसर, शिवनेरी चौक, बस स्टँड चौक, आमनी आसरा रोड (उत्तम टॉकीज), नवीन पूल, माहूर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, धान्य मार्केट आणि महालुंगी पॉईंट यांसारख्या प्रमुख ठिकाणांचा मुख्य बाजारपेठेत समावेश होतो. या सर्वच भागांत नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी असते. मात्र, योग्य पार्किंग व्यवस्था नसल्याने ग्राहकांना आपली वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात.
बाजारपेठेतील रस्ते मुळातच अरुंद आहेत, त्यातच काही व्यावसायिकांनी आपली दुकाने चक्क रस्त्यापर्यंत वाढवून अतिक्रमण केले आहे. यामुळे रस्ते अधिकच अरुंद झाले असून मोठ्या वाहनांना ये-जा करणे कठीण झाले आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, ज्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव रस्त्यावर लावलेल्या वाहनांवर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाते. यामुळे एका बाजूला वाहतूक कोंडीचा मनस्ताप आणि दुसऱ्या बाजूला ‘नो पार्किंग’चा दंड, अशा दुहेरी संकटात वाहनधारक सापडले आहेत.
शहरातील ही गुंतागुंतीची समस्या सोडवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. आगामी नगर परिषदेच्या सभेत पार्किंग सुविधेचा प्रस्ताव ठेवून शहरात हक्काची पार्किंगची जागा निर्माण करावी, जेणेकरून अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे होतील आणि नागरिकांना विनासायास खरेदी करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.