आजंती डॅममध्ये बुडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू; चप्पल काढण्याच्या प्रयत्नात काळाचा घाला….

0

🔥आजंती डॅममध्ये बुडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू; चप्पल काढण्याच्या प्रयत्नात काळाचा घाला.

हिंगणघाट -/ मित्रांसह आंघोळीकरिता गेलेल्या बोरगाव (दातार) येथील २१ वर्षीय युवकाचा आजंती डॅममध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना महाशिवरात्रीच्या दिवशी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, बोरगाव (दातार) येथील सहा युवक सकाळी सुमारे १० वाजताच्या दरम्यान वना नदीवरील आजंती डॅम येथे आंघोळीकरिता गेले होते. सर्वजण आंघोळ करून बाहेर आल्यानंतर आकाश शेषराव बावणे (वय २१) याची चप्पल नदीच्या प्रवाहात पडली. ती काढण्याच्या प्रयत्नात तो अनवधानाने खोल पाण्यात गेला व तोल जाऊन पाण्यात बुडाला.
त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो दिसेनासा झाला. यानंतर मित्रांनी गावात धाव घेऊन ग्रामस्थ व पोलिसांना माहिती दिली. ग्रामस्थ व पोलिसांनी शोधमोहीम राबविली असता सायंकाळी सुमारे ३.४५ वाजताच्या दरम्यान आकाशचा मृतदेह हाती लागला.
आकाश हा आपल्या कुटुंबातील एकमेव मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील व एक लहान बहीण असा आप्तपरिवार आहे. तो आयटीआय शिक्षण पूर्ण करून पदवीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. कुटुंबाचा आधार हरवल्याने या शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. या दुर्दैवी घटनेमुळे बोरगाव (दातार) व परिसरात शोककळा पसरली आहे.

इकबाल पहेलवान ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!