🔥आमदार राजु तोडसाम यांची मारवाडी समाजाविरुध्द शिवीगाळ.
🔥समाजाचा अवमान केल्याप्रकरणी पोलिस अधिक्षकांकडे तक्रार.
यवतमाळ -/ केळापूरचे भाजपाचे आमदार राजू तोडसाम यांचा मारवाडी समाजाबाबत शिवीगाळ करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते माजी आमदार संदीप बाजोरिया तसेच मारवाडी समाजाबाबत अपमानास्पद वक्तव्य करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मारवाडी समाजाचा अवमान केल्याप्रकरणी आमदार राजू तोडसाम यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल कोमावार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करून केली आहे.आर्णी येथील भाजपाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आमदार राजू तोडसाम यांनी स्वतः हा व्हिडिओ पोस्ट केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर हा व्हिडिओ जिल्ह्यातील अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर वेगाने व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये राजू तोडसाम हे माजी आमदार संदीप बाजोरिया तसेच मारवाडी समाजाबाबत अपमानास्पद भाषा वापरत असल्याचे दिसून येत आहे.
भाजप पक्ष मारवाडी समाजाला आपली महत्त्वाची मतदारसंघीय ताकद असल्याचे वारंवार सांगत असतो. अशा परिस्थितीत भाजपाचेच आमदार असलेल्या राजू तोडसाम यांनी मारवाडी समाजाविरुद्ध शिवीगाळ केल्यामुळे भाजप नेतृत्व या प्रकरणात कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यापूर्वीही आमदार राजू तोडसाम वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एका क्रिकेट सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला शूज घालून हार अर्पण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. क्रिकेट स्टंपची पूजा करताना शूज काढून पूजा करण्यात आली; मात्र शिवाजी महाराजांना शूज घालून हार अर्पण केल्याने समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार राजू तोडसाम यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली होती. याशिवाय, बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा मारवाडी समाजाविरुद्ध शिवीगाळ केल्याच्या आरोपामुळे समाजात संताप व्यक्त केला जात आहे.
🔥पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
मारवाडी समाजाविरुद्ध शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून आमदार राजू तोडसाम यांच्या विरोधात यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे अमोल कोमावार यांनी तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार करून या प्रकरणात योग्य ती समज देण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती अमोल कोमावार यांनी दिली.(क्रमशः)