“आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली: भिडीकरांचा आमदारांना 7 दिवसांचा अल्टिमेटम”

0

🔥“आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली: भिडीकरांचा आमदारांना 7 दिवसांचा अल्टिमेटम”

देवळी -/ भिडी येथील ग्रामीण रुग्णालयातील अत्यंत गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांचा संताप तीव्र झाला असून आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र समोर आले आहे. “श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य अभियान” शिबिराच्या वेळी पारस चोरे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी आमदार राजेश भाऊ बकाने यांना निवेदन देत थेट 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला.
रुग्णालयात मंजूर 3 वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी केवळ 1 अधिकारी कार्यरत असून उर्वरित पदे रिक्त असल्यामुळे रुग्णसेवा पूर्णतः ठप्प झाली आहे. अधीक्षक डॉ. प्रमोद खोडपे यांच्याकडे पुलगाव व भिडी या दोन्ही ठिकाणांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने रुग्णांना वेळेवर व योग्य उपचार मिळत नसल्याची गंभीर तक्रार करण्यात आली.
तसेच, पात्र डॉक्टरांऐवजी इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून रुग्णांची तपासणी केली जात असल्याचे प्रकार समोर येत असून हा प्रकार रुग्णांच्या जीवाशी खेळ असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी पारस चोरे म्हणाले की, “आम्ही यापूर्वीही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रशासनाचा हा निष्क्रियपणा अत्यंत गंभीर असून काही दिवसांत परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू.”
भिडी परिसरातील हजारो नागरिक या रुग्णालयावर अवलंबून असून राष्ट्रीय महामार्गालगत असल्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत अपुरे मनुष्यबळ व ढिसाळ प्रशासनामुळे भविष्यात गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
ग्रामस्थांनी रिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची तात्काळ नियुक्ती, भिडी येथे स्वतंत्र पूर्णवेळ डॉक्टर नेमणूक, तसेच रुग्णांची तपासणी केवळ पात्र डॉक्टरांकडूनच करण्याची सक्ती यांसारख्या मागण्या केल्या आहेत. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, पुढील 7 दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आल्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून या प्रकरणाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)

            राजू वाटाणे साहसिक             News-24 भिडी 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!