आर्णी पोलीस ठाण्यातच अकॅब चा सापळा;पोलीस हवालदार 10 हजारांची लाच घेताना ताब्यात..!

0

🔥आर्णी पोलीस ठाण्यातच अकॅब चा सापळा;पोलीस हवालदार 10 हजारांची लाच घेताना ताब्यात..!🔥भावाच्या अटकपूर्व जामिनाची अंमलबजावणी व तपासात मदतीसाठी 15 हजारांची मागणी; तडजोडीनंतर 10 हजार स्वीकारताना कारवाई

(विभागीय प्रतिनिधी)यवतमाळ-/ आर्णी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात न्यायालयाने मंजूर केलेल्या अटकपूर्व जामिनाची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी लाचेची मागणी केल्याच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली. आर्णी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार अरविंद राजाराम पाटील जाधव (वय ४४) यांना 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई बुधवारी, 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी आर्णी पोलीस ठाण्यातच करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रेस नोटनुसार तक्रारदार हे 55 वर्षीय शेतकरी आहेत. त्यांच्या भावाविरुद्ध आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून संबंधित प्रकरणात न्यायालयाने त्यांच्या भावाला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार अरविंद जाधव यांच्याकडे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तक्रारदार आपल्या भावासह जाधव यांना भेटले आणि न्यायालयाचा अटकपूर्व जामीन मंजुरीचा आदेश देत त्यानुसार जामिनाची पुढील कार्यवाही करण्याची विनंती केली. त्यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार जामीन देण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला. त्यानंतर त्यांनी यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 19 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली.

🔥कोट 1 पडताळणीत 15 हजारांची मागणी; 10 हजारांवर तडजोड

तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच दिवशी सकाळी 11.51 ते दुपारी 1.40 वाजेदरम्यान आर्णी पोलीस ठाण्यात पंचासमक्ष मागणी पडताळणी केली. या पडताळणीत संबंधित हवालदाराने 15 हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 10 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.

🔥कोट 2 पोलीस ठाण्यातच स्वीकारले 10 हजार

त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. सायंकाळी 6.58 ते 7.21 वाजेदरम्यान तक्रारदाराला पंचासह आर्णी पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. यावेळी तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर एसीबीच्या पथकाने अरविंद जाधव यांना ताब्यात घेतले. त्यांच्या पॅन्टच्या खिशातून लाचेची 10 हजार रुपयांची रक्कम जप्त केले 

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम 7 अन्वये आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने सांगितले. संबंधित पोलीस हवालदाराच्या राहत्या घराची झडती घेण्याची कारवाईही सुरू असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

🔥कोट 3 अभय आष्टेकर यांच्या नेतृत्वात कारवाई

ही सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळचे पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकामध्ये पोलीस निरीक्षक मनोज ओरके, पोलीस हवालदार जयंत ब्राम्हणकर, अतुल मत्ते, सुधीर कांबळे, पोलीस शिपाई सतिश सोनोने, महिला पोलीस शिपाई सरिता राठोड आणि चालक पोलीस हवालदार दिनेश सरोदे यांचा समावेश होता.

       ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 आर्णी,यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!