आर्वी -/कामगार चळवळीसाठी देशात ओळखल्या जाणारे आर्वीपुत्र दत्तोपंत ठेंगडी यांचे नाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्याचा निर्णय झाला. त्यासाठी भाजपा नेते सुमित वानखेडे यांनी महाराष्ट्र शासनाकडे तसा पाठपुरावा केला. त्यामुळे भूमिपुत्र सुमित वानखेडे यांनी आर्वीपुत्र दत्तोपंतजी ठेंगडी यांचा सन्मान केला असेच म्हणावे लागेल.
आर्वीचे नाव देशाच्या इतिहासात कोरणारे दत्तोपंतजी ठेंगडी यांचे जन्मगाव वर्धा जिल्ह्यातील आर्वी असल्याने आर्वीकरांसाठी त्यांचे नाव श्रद्धास्थानी आहे. राज्य सरकारने आयटीआयला दत्तोपंत ठेंगडी असे नाव देण्याचा निर्णय घेतल्याने भाजपा नेते सुमित वानखेडे यांनी नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आले असल्याने त्यांची भेट घेऊन आर्वीकरांच्या वतीने आभार मानले.
आपल्या गावातीलच नव्हे तर देशातील कामगार चळवळीत अग्रेसर असलेले स्व. दत्तोपंत ठेंगडी यांच्या स्मृती आर्वीत यापूर्वीच काही तरी व्हायला हवे होते. परंतु, ते कार्य आपल्या हातून होणे ही ईश्वरी कृपाच म्हणावी लागेल. दत्तोपंत ठेंगडी यांच्या विषयीची माहिती नवीन पिढीला अवगत व्हावी म्हणून आपले प्रयत्न होते. त्याला मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला असल्याचे भाजपा नेते सुमीत वानखेडे यांनी सांगितले. दत्तोपंत ठेंगडी यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1920 ला आर्वी येथे झाला. ते हिंदू विचारवंत, कामगार संघटना नेते आणि स्वदेशी जागरण मंच , भारतीय मजदूर संघ आणि भारतीय किसान संघाचे संस्थापक होते. दत्तोपंतांनी इंग्रजी, हिंदी व मराठीमध्ये जवळपास 104 पुस्तके लिहिली. त्यांचे ’थर्ड वे’ आणि ’कार्यकर्ता’ ही पुस्तके अजरामर झालीत. साधी राहणी, उच्च विचारसरणी, अभ्यासू वृत्ती, स्पष्ट विचार आदी गुणांमुळे दत्तोपंत आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. विविध पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी जे विचारधन दिले, ते भारतीय मजदूर संघासाठी आजही मार्गदर्शक आहे. त्यामुळे आर्वी भुमीचे नाव उच्च शिखरावर कोरणारे दत्तोपंतजी ठेंगडी आर्वीचे असल्याने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नावच दत्तोपंतजी ठेंगडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे केल्याने ही बाब गौरवास्पद असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.