इंजिनीअरिंग कॉलेजच्या ‘त्या’ नराधम विभाग प्रमुखाला विद्यार्थ्यांनी फोडले पण पोलीस आणि संस्थाचालकांकडून रंगाचा ‘बेरंग’ करण्याचा प्रयत्न?..

0

🔥इंजिनीअरिंग कॉलेजच्या ‘त्या’ नराधम विभाग प्रमुखाला विद्यार्थ्यांनी फोडले,पण पोलीस आणि संस्थाचालकांकडून रंगाचा ‘बेरंग’ करण्याचा प्रयत्न?

​यवतमाळ -/ शिक्षणाचे पवित्र मंदिर मानल्या जाणाऱ्या यवतमाळमधील अमरावती रोडवरील एका प्रतिष्ठित इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये गुरुवारी काळिमा फासणारी घटना घडली. केमिकल विभागाच्या एका विद्यार्थिनीशी अश्लील चाळे आणि लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अजय नावाच्या विभाग प्रमुखाला (HOD) संतप्त विद्यार्थ्यांनी चांगलाच चोप दिला. मात्र, धक्कादायक बाब अशी की, या प्रकरणात एका बड्या मंत्र्याच्या निकटवर्तीयाचे नाव गुंतलेले असतानाही, पोलीस प्रशासन आणि वादग्रस्त संस्थाचालक हे प्रकरण दडपण्यासाठी रात्रीतून हालचाली करत असल्याचा खळबळजनक आरोप आता होत आहे.
​ केमिकल डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असलेल्या एका विद्यार्थिनीवर या विभागाचा प्रमुख अजय हा गेल्या काही दिवसांपासून वाईट नजर ठेवून होता. गुरुवारी या नराधमाने मर्यादेचे उल्लंघन करत विद्यार्थिनीशी जवळीक साधण्याचा आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा संयम सुटला. ‘विद्येच्या मंदिरात असले नराधम नकोत’ अशी गर्जना करत शेकडो विद्यार्थ्यांनी संबंधित विभाग प्रमुखाला घेराव घातला आणि त्याची चांगलीच धुलाई केली.
​यावेळी विद्यार्थ्यांनी या नराधमावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी लावून धरली होती. मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून त्यात पीडित विद्यार्थिनी आणि आक्रमक झालेले विद्यार्थी स्पष्टपणे दिसत आहेत.
​​ही घटना घडल्यानंतर २४ तास उलटले तरी लोहारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांची भूमिका संशयास्पद ठरत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित संस्थाचालक—ज्यावर यापूर्वीही ‘पोक्सो’ (POCSO) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल झालेला आहे—त्याने पोलिसांवर दबाव आणून हे प्रकरण थंडबस्त्यात टाकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
​कालपर्यंत वाघासारखे डरकाळी फोडणारे विद्यार्थी आज अचानक ‘निशब्द’ कसे झाले? हा यवतमाळच्या शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. रात्रीतून असा कोणता ‘कट’ शिजला की विद्यार्थ्यांच्या तोंडचे पाणी पळाले? पोलिसांच्या धाकामुळे की संस्थाचालकाच्या धमकीमुळे विद्यार्थी गप्प झाले आहेत, असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत.
​विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थिनीसोबत हा प्रकार घडला आणि जी मारहाणीच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे, तिला विचारणा केली असता तिने “मला काहीच माहित नाही” अशी प्रतिक्रिया दिली. एका रात्रीत पीडितेचे मतपरिवर्तन झाले की तिला मंत्र्यांच्या आणि संस्थाचालकाच्या नावाने धमकावण्यात आले? यामागे नक्कीच मोठे ‘राजकारण’ असल्याचे दिसून येत आहे. ​यवतमाळमधील हा तथाकथित प्रतिष्ठित संस्थाचालक आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीसाठी आधीच कुख्यात आहे. अशातच एका बड्या मंत्र्याच्या निकटवर्तीय तरुणीचे नाव या प्रकरणात आल्यामुळे प्रकरण चिघळू नये, म्हणून मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. “आमच्या मुलांच्या भविष्याचा विचार न करता, नराधम शिक्षकांना वाचवण्यासाठी किती रुपयांची ‘डिलिंग’ झाली?” असा थेट प्रश्न आता पालकांनी उपस्थित केला आहे. लोहारा पोलीस कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत?
व्हिडिओ पुरावा असतानाही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ का, विद्यार्थ्यांना धमकावणाऱ्या संस्थाचालकावर कारवाई कधी होणार? बड्या मंत्र्यांचे नाव वाचवण्यासाठी न्यायाचा गळा घोटला जाणार का?
​यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणात लक्ष घालून या नराधम विभाग प्रमुखाला आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या संस्थाचालकाला तुरुंगाची हवा दाखवणार का? की पैशाच्या जोरावर हे प्रकरण कायमचे दाबले जाणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!