एसटीच्या ५०% सवलतीसाठी ‘स्मार्ट कार्ड’ बंधनकारक; यवतमाळ बसस्थानकात महिलांच्या लांबच लांब रांगा….

0

🔥एसटीच्या ५०% सवलतीसाठी ‘स्मार्ट कार्ड’ बंधनकारक; यवतमाळ बसस्थानकात महिलांच्या लांबच लांब रांगा.

यवतमाळ -/ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसप्रवासात महिलांना देण्यात आलेली ५० टक्के सवलत मिळविण्यासाठी आता ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) किंवा स्मार्ट कार्ड काढणे बंधनकारक करण्यात आल्याने राज्यातील अनेक बसस्थानकांप्रमाणेच स्थानिक यवतमाळ बसस्थानकातही महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना कार्ड काढण्यासाठी मोठ्या रांगा लावण्याची वेळ येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महाराष्ट्र शासनाने २०२३ पासून “महिला सन्मान योजना” अंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये महिलांना प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता.या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ महिलांनी घेतला असून राज्यभरात महिला प्रवाशांची संख्या देखील वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र अलीकडे एसटी महामंडळाने डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.या कार्डसाठी सुमारे १९९ रुपये शुल्क आकारले जात असून त्यामध्ये ठरावीक रक्कम शिल्लक ठेवणे आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली आहे.त्यामुळे आधी ओळखपत्र दाखवून ५० टक्के सवलतीत प्रवास करणाऱ्या महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना आता हे कार्ड काढणे आवश्यक झाले आहे.
दरम्यान,स्थानिक यवतमाळ बसस्थानकात आज महिलांच्या व ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या.ग्रामीण भागातून आलेल्या अनेक महिलांना उन्हात उभे राहून कार्ड काढण्यासाठी तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या संदर्भात शेतकरी चळवळीचे प्रा.पंढरी पाठे,सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके,सुरेश कुमरे व कॉम्रेड सचिन मनवर यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदविला आहे.महिलांना ५० टक्के सवलतीच्या नावाखाली कार्डसाठी शुल्क आकारून त्यांना रांगेत उभे करण्याची वेळ येत असल्याचा आरोप त्यांनी केला.शासनाने तात्काळ याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा,अन्यथा या प्रश्नावर जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सदर व्यवस्थेबाबत एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर व्यवस्था करण्यात येणार का,तसेच कार्ड वितरणाची प्रक्रिया सुलभ होणार का,याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

   ब्युरो रिपोर्ट साहसिक                             News-/24 यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!