सेलू -/प्रजासत्ताक दिनानिमित्त एंजल पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल, केळझर, सुनीता नर्सिंग स्कूल तसेच नरेंद्र सूर्यवंशी कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी रोजी भव्य रॅली व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी अनिल मांडवकर उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक नरेंद्र सूर्यवंशी यांनी कार्यक्रमात मार्गदर्शन केले. यावेळी नरेंद्र सूर्यवंशी कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य सागर सिरसाट, सुनीता नर्सिंग स्कूलच्या प्राचार्या पौर्णिमा मॅडम, एंजल पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका नेहा अन्सारी व रीना तुमडाम यांच्यासह तिन्ही संस्थांचे शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध कवायतीने झाली. लेझीम व डंबेल्सच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी केळझर गावातील बाजार चौकात आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली. देशभक्तीपर घोषवाक्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
यावेळी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, राजगुरू, भगतसिंग, सुखदेव आदी थोर राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषा परिधान करून गावातून भव्य रॅली काढली. या रॅलीला ग्रामस्थांकडून विशेष प्रतिसाद मिळाला. तसेच सुनीता नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवत कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त व सामाजिक जाणीव निर्माण झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. सर्व स्तरांतून कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले.