🔥कोतेवाडा येथे वेणा नदी पुरस्सरक्षण भिंत बांधकामात मोठा घोटाळा? निकृष्ट साहित्य वापराचा गंभीर आरोप; चौकशीची मागणी तीव्र.
हिंगणा -/ हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा गावाजवळ वेणा नदीच्या तीरावर सुरू असलेल्या पुरस्सरक्षण भिंत बांधकामात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.कामस्थळी लावलेल्या फलकानुसार या प्रकल्पासाठीरुपये ५५४.५५ लक्ष रुपये इतका सार्वजनिक निधी मंजूर आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणीदरम्यान भिंत बांधकामासाठी वापरली जाणारी रेती ही नदीपात्रातील जाड, मातीयुक्त व गाळमिश्रित असल्याचे दिसून येत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. तज्ज्ञांच्या मते अशा निकृष्ट रेतीमुळे सिमेंट काँक्रीटची बंधनक्षमता कमी होते, भिंतींमध्ये लवकर तडे जाणे, धूप वाढणे व पुराच्या पाण्याच्या दाबास तोंड न देता संपूर्ण संरक्षणभिंत धोक्यात येण्याचा गंभीर धोका निर्माण होतो. परिणामी भविष्यात कोतेवाडा गावाला पूराचा मोठा फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
याहून धक्कादायक बाब म्हणजे इतक्या कोटींच्या कामासाठी ठेकेदार कोण, कामाचा पर्यवेक्षक कोण, तांत्रिक जबाबदारी कोणाकडे याची कोणतीही स्पष्ट माहिती कामस्थळी उपलब्ध नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कामाच्या ठिकाणी आवश्यक माहिती फलकावर फक्त मंजूर निधीचा उल्लेख असून ठेकेदाराचे नाव, संपर्क क्रमांक, कामाचा कालावधी, तांत्रिक अधिकारी यांचा तपशील नसल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, *“सार्वजनिक पैशातून होणाऱ्या कामात अशी गुप्तता का* ? *निकृष्ट साहित्य वापरून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा संशय आहे.”* त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून साहित्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासावेत, कामाची गुणवत्ता अहवाल सार्वजनिक करावा आणि दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
स्थानिक नागरिकांनी हिंगणा विधानसभा आमदार समीर मेघे यांनी तातडीने स्थळभेट देऊन कामाची गुणवत्ता तपासावी, तसेच कामस्थळी ठेकेदाराचे नाव, मोबाईल क्रमांक, कामाची किंमत, कालावधी व वापरल्या जाणाऱ्या साहित्याची माहिती दर्शविणारा अधिकृत फलक तात्काळ लावण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. तसेच संपूर्ण कामाचे अधिकृत व्हिडिओ चित्रीकरण करून तांत्रिक विभागाकडून तपासणी करण्यात यावी, अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा देत आहेत. कोट्यवधींच्या पुरस्सरक्षण प्रकल्पातच निकृष्ट काम झाल्यास भविष्यातील संभाव्य पूरस्थितीत गावाचा जीवित-मालमत्तेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
“जनतेच्या पैशावर डल्ला टाकणाऱ्यांना संरक्षण नाही; वेणा नदी भिंत बांधकामातील कथित भ्रष्टाचार उघड करा” अशी मागणी करत ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला असून या प्रकरणाकडे संपूर्ण हिंगणा तालुक्याचे लक्ष लागले आहे.