🔥गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यस्तरीय शंकरपट व कृषी महोत्सवाचा जल्लोषात शुभारंभ.!
सेलू -/ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वडगाव रस्त्यावरील बालू सोनटक्के यांच्या शेतात आयोजित राज्यस्तरीय शंकरपट व कृषी महोत्सवाचा थाटामाटात शुभारंभ करण्यात आला. साहसिक जनशक्ती संघटना व मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या भव्यदिव्य शंकरपटाचे उद्घाटन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस यांच्या हस्ते झाले.
गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता बैलजोडी पूजन व धुरकऱ्यांचा सत्कार करून शंकरपटाचा पारंपरिक पद्धतीने शुभारंभ करण्यात आला. यावेळी बालू सोनटक्के यांच्या बैलजोडीने दाणीत दमदार धाव घेत उपस्थितांची दाद मिळवली. विशेष म्हणजे, उद्घाटनानंतर रामदास तडस यांनी स्वतः छकड्यावर स्वार होत बैलजोडी हाकत कार्यक्रमात रंगत आणली.
यावेळी बोलताना तडस यांनी शंकरपटासारख्या ग्रामीण परंपरांचा गौरव करत, याठिकाणी कुस्ती स्पर्धांचेही आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, इतक्या सुनियोजित पद्धतीने कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले.
कार्यक्रमाला साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र कोटंबकार, शंकरपट आयोजन समितीचे अध्यक्ष बंटी उर्फ भूषण वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते सुरज चव्हाण, प्रगतिशील शेतकरी बालू सोनटक्के यांची प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे संचालन सेवानिवृत्त शिक्षक संतोष डाखोळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सागर राऊत यांनी मानले. या सोहळ्यास शंकरपट प्रेमी, नागरिक व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.