घनदाट व मौल्यलान सागवानाची ​पोफाळीच्या वनविभागाच्या आशीर्वादाने तस्करांचा उच्छाद, (उमरखेडचे वनाधिकारी ‘निकामी’ लाखो रूपयाचा मलिदा लाटण्यातच मग्न….

0

🔥हेच ते घनदाट व मौल्यलान सागवानाची ​पोफाळीच्या वनविभागाच्या आशीर्वादाने तस्करांचा उच्छाद,होऊन(उमरखेडचे वनाधिकारी ‘निकामी’ लाखो रूपयाचा मलिदा लाटण्यातच आहे मग्न.

​यवतमाळ -/ निसर्गाचा अनमोल ठेवा आणि उमरखेड तालुक्याचे वैभव असलेल्या पोफाळी शिवारातील सागवान जंगलावर सध्या मृत्यूचे सावट पसरले आहे. रक्षणकर्तेच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा काय होते, याचा विदारक अनुभव पोफाळी परिसरात येत आहे. वनविभागाचे कर्मचारी आणि लाचखोर अधिकाऱ्यांच्या उघड संगनमताने या भागात सागवान तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, शेकडो पुरातन सागवान झाडांची बुडासकट कत्तल करण्यात आली आहे. ‘जंगल बोडखे’ करून स्वतःच्या घराच्या तिजोऱ्या भरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे आता उमरखेडचे जंगल फक्त नकाशावर उरण्याची भीती निर्माण झाली आहे.
​​पोफाळी परिसरातील तरोडा भाग सध्या एखाद्या ‘युद्धभूमी’सारखा दिसत आहे. येथे गेल्या अनेक दिवसांपासून गोलाई प्राप्त असलेल्या शंभराहून अधिक मौल्यवान सागवान झाडांची कत्तल करण्यात आली आहे. केवळ मोठेच नव्हे, तर वाढीच्या अवस्थेत असलेल्या लहान सागाच्या झाडांनाही तस्करांनी सोडलेले नाही. जंगलात जागोजागी पडलेली झाडांची थुटे, लाकडाचे तुकडे आणि ताज्या भुसाचा खच या गोष्टीची साक्ष देतोय की, ही कत्तल एका दिवसात झालेली नाही. हे रॅकेट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि वनविभागाच्या अभयाखाली महिनाभरापासून सुरू असल्याचा दाट संशय आहे.
​​तस्करांनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी चक्क कायद्याच्या पळवाटा शोधून जंगलाचा घास घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका शेतमालकाचा संमती बाँड कागदोपत्री तयार करून, त्याच्या नावाखाली इतर सर्वे नंबरमधील शेकडो झाडांची कत्तल केली गेली आहे. आदिवासी पट्ट्यातूनही मोठ्या प्रमाणात अवैध सागवान लंपास करण्यात आले आहे. “एक दाखवायचा आणि शंभर तोडायचे” या सूत्रानुसार वनविभागाच्या आशीर्वादाने हा सावळा गोंधळ सुरू आहे. पोफाळी क्षेत्रातील वनरक्षक आणि क्षेत्रसहाय्यक यांना या सर्व हालचालींची पूर्ण कल्पना असूनही, त्यांनी आर्थिक हितसंबंधापोटी डोळे मिटून घेतल्याचा आरोप नागरिक उघडपणे करत आहेत.
​​स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या शांततेत आणि भरदिवसाही लाकूड कापण्याच्या आधुनिक कटर यंत्रांचा आवाज या परिसरात घुमत असतो. तोडलेले लाकूड वाहून नेण्यासाठी ट्रक आणि ट्रॅक्टरची मोठी साखळी कार्यरत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, ज्या मार्गावरून हे लाकूड नेले जाते, तिथे वनविभागाचे नाके आणि गस्त असतानाही एकही गाडी पकडली जात नाही. हे सर्व ‘मॅनेज’ करून सुरू असून, प्रत्येक झाडामागे वन विभागातील खालपासून वरपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना ‘हप्ता’ पोहोचवला जात असल्याची चर्चा परिसरात जोर धरत आहे.
​​या गंभीर प्रकरणातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) आणि क्षेत्रसहाय्यक यांची भूमिका. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पगार घेणारे हे अधिकारी एसी केबिनमध्ये बसून तस्करीकडे दुर्लक्ष करत आहेत. जेव्हा सामान्य नागरिक तक्रार करतात, तेव्हा केवळ नावापुरता पंचनामा करून प्रकरण दडपण्याचे काम सुरू आहे. “वरपर्यंत वाटा द्यावा लागतो” असे सांगून खालचे कर्मचारी आपली कातडी वाचवत आहेत. या भागातील सागवान तस्करी आता केवळ गुन्हा राहिलेली नसून, तो एक संघटित व्यवसाय बनला आहे, ज्याचा मुख्य सूत्रधार वनविभागाची यंत्रणाच असल्याचे दिसून येते.
​​पोफाळीच्या या ‘सागवान संहारा’मुळे उमरखेडमधील पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जर यावर तात्काळ नियंत्रण मिळवले नाही, तर येणाऱ्या काही वर्षात या भागात केवळ उजाड माळरान उरेल. राज्याचे वनमंत्री आणि मुख्य वनसंरक्षकांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेणे गरजेचे आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक-News/24 यवतमाळ-वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!