जिल्ह्यात 86 हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी
प्रतिनिधी/ वर्धा:
शेतक-यांनी खरिप हंगामासोबतच रब्बी व उन्हाळी पिकेही मोठ्या प्रमाणावर घ्यावीत यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार रब्बी व उन्हाळी मिळून 1 लाख 10 हजार हेक्टरवर पेरणी होणार आहे. आजमितीस 86 हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी पूर्ण झाली असून रब्बीचा हा आकडा 1 लाख हेक्टरवर जाणार आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी रब्बी व उन्हाळी क्षेत्र वाढविण्याच्या अनुषंगाने नुकतीच संबंधीत विभागांच्या अधिका-यांची बैठक घेतली.
बैठकीला जिल्हाधिका-यांसह जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, उपविभागीय कृषि अधिकारी अजय राऊत, अग्रणी बँक प्रबंधक वैभव लहाने, तसेच जलसंपदा व सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री सुनिल केदार यांनी जिल्ह्यात रब्बी व उन्हाळी पिकांचे क्षेत्र वाढविण्याचे निर्देश दिले होते. विशेषत: भुईमुंग व उन्हाळी सोयाबीन घेण्याच्या सुचना त्यांनी केल्या होत्या. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी संबंधित विभागांच्या अधिका-यांची बैठक घेऊन जिल्ह्यात दोनही पिकांचे क्षेत्र वाढविण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्यात रब्बीचे 1 लाख 5 हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी आतापर्यंत 86 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक पेरणी 72 हजार 500 इतके क्षेत्र हरभरा पिकाचे आहे. त्याखालोखाल ज्वारी, गहु व मकाचे क्षेत्र 11 हजार 500 हेक्टर. गळीत धान्य 160 हेक्टर यासह इतर पिकांचा समावेश आहे. रब्बीचे अंतिम पेरणी क्षेत्र 1 लाखाच्या वर जाण्याचा अंदाज आहे.
रब्बी व उन्हाळी हंगामासाठी बियाणांची पुरेशी उपलब्धता करुन देण्यात आली आहे. रब्बी व उन्हाळी मिळून 50 हजार क्विंटल बियाणे शेतक-यांना उपलब्ध करुन दिले जात आहे. त्यात सर्वाधिक 26 हजार 500 क्विंटल बियाणे गहू तर 19 हजार 500 क्विंटल बियाणे हरभरा लागवडीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. उन्हाळी भुईमुंगासाठी जवळजवळ 5 हजार क्विंटल बियाणांची तरतूद करण्यात आली आहे.
हजार हेक्टरवर उन्हाळी सोयाबीन
जिल्ह्यात यावर्षी पहिल्यांदाच मोठ्या प्रमणावर उन्हाळी सोयाबीन लागवडीचा प्रयोग करण्यात येणार आहे. उन्हाळी सोयाबीनला चांगला भाव मिळतो शिवाय उत्पादनही चांगले मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे 1 हजार हेक्टरवर यावर्षी पहिल्यांदाच उन्हाळी सोयाबीनची लागवड केली जाणार आहे. जिल्ह्यात रब्बी पिकांसाठी चांगल्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर रब्बी व उन्हाळी पिके घ्यावीत. त्यासाठी कृषि विभागाने सुध्दा जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी संबंधितांस निर्देश दिले.