हिंगणघाट -/तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
तालुक्यातील मानोरा व काजळसरा भागात बुधवारी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे घरांचे व जनावरांच्या गोठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सुसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे व गोठ्यांचे छप्परे उडाल्याची माहिती मिळाली आहे.
काजळसरा येथील २ शेतकऱ्यांच्या गोठयाची छप्परे उडाली तर याच तलाठी साझ्यातील मानोरा येथील ८ गोठ्यांची टिनाची छप्परे उडाली आहेत, येथील तलाठी कु. ढोक यांनी तसा अहवाल तहसील कार्यालयास सादर केला आहे.
अवकाळी पावसामुळे मौजा इंझाळा येथील गोठ्यांचे नुकसान झाले आहे, काल झालेल्या वादळी पावसामुळे या भागात कांदा पिकालाही नुकसान पोहोचले आहे.
तालुक्यातील मौजा शेकापूर मोझरी येथील पौर्णिमा विनोद मशाखेत्री यांचे घराचे वादळामुळे टिन पत्रे उडाल्याची ही माहिती महसूल प्रशासनातर्फे मिळाली.
नायब तहसीलदार सागर कांबळे यांनीसुद्धा यास दुजोरा दिला असून त्यांचे प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील नुकसान ग्रस्त घरांची संख्या ३६ आहे तर बाधित गोठ्यांची संख्या २१ अशी आहे.