किनवट -/अनुसूचित जाती आरक्षणातील ए, बी, सी, डी वर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी देशातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी लेखी स्वरूपात आपला पाठिंबा दिला असून, सर्वोच्च न्यायालयानेही या वर्गीकरणास मान्यता दिली आहे. मात्र, तेलंगणा सरकारकडून अद्याप या वर्गीकरणाची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यामुळे एम.आर.पी.एस.चे राष्ट्रीय अध्यक्ष व संघर्ष योद्धा मंदा कृष्णा मादिगा यांनी मादिगा, मातंग तसेच तत्सम वंचित-उपेक्षित समाजांच्या हक्कासाठी आंदोलन पुकारले आहे.हे आंदोलन शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता हैदराबाद येथील एल.बी. स्टेडियमपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मोठ्या मोर्चाच्या स्वरूपात काढण्यात येणार आहे. यामध्ये एक लाख डफ, हलगी व इतर लोककलाकारांच्या आवाजातून तेलंगणा सरकारला जाग आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे.मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष के. मूर्ती अण्णा यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, “अनुसूचित जाती आरक्षणातील वर्गीकरणामुळे मादिगा, मातंग आणि तत्सम वंचित-उपेक्षित समाजांना न्याय मिळेल. या आंदोलनात गटबाजी विसरून एकजुटीने सहभागी होणे गरजेचे आहे.”मंदा कृष्णा मादिगा यांचा ३० वर्षांचा संघर्ष:मंदा कृष्णा मादिगा यांनी गेल्या ३० वर्षांपासून या वर्गीकरणाच्या मागणीसाठी देशभरात विविध आंदोलने केली आहेत. यावेळी अनेक प्रमुख नेत्यांनी त्यांना राजकीय पदे देऊ केली, परंतु त्यांनी कोणताही राजकीय तडजोड न करता समाजाच्या हक्कांसाठीच आपले जीवन वाहिले आहे. “वर्गीकरण अंमलबजावणी हेच माझे ध्येय आहे,” असे ते ठामपणे सांगतात.या आंदोलनासाठी महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार असून, प्रत्येकाने आपले डफ, हलगी घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक अधिकारांच्या अधारेच हे आंदोलन राबवले जात आहे.