वर्धा -/११ फेब्रुवारी २०२४: युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, युवा कार्यक्रम विभाग, भारत सरकार द्वारे नेहरू युवा केंद्र-मेरा युवा भारत यांच्या वतीने आयोजित आंतर जिल्हा आदान-प्रदान कार्यक्रमाचे आयोजन १० ते १४ फेब्रुवारी २०२५ दरम्यान महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या सहकार्याने केले जात आहे. या पाच दिवसांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन १० फेब्रुवारी रोजी विश्वविद्यालयाच्या महादेवी वर्मा सभागृहात कुलसचिव प्रो. आनन्द पाटील यांच्या उपस्थितीत आणि गांधी व शांती अध्ययन विभागाचे अध्यक्ष डॉ. राकेश मिश्र यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. या प्रसंगी प्रो. पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी असे कार्यक्रम आवश्यक आहेत. यातून विद्यार्थ्यांना भाषा, साहित्य, खान-पान, जन-जीवन आणि परिवेश यांचे ज्ञान मिळते तसेच त्यांना देशाची संस्कृती, इतिहास आणि परंपरांचीही जाणीव होते.अध्यक्षीय भाषणात डॉ. राकेश मिश्र म्हणाले की हा कार्यक्रम एक प्रकारे भारताला जाणून व समजून घेण्याची संधी प्रदान करतो. यामुळे भारतीयत्वाची भावना अनुभवण्याची संधी मिळते. वर्ध्याचे महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणाले, गांधीजी येथे १० वर्षे राहिले होते. आजही गांधी आश्रम गांधीजींच्या काळात ज्या पद्धतीने चालवला जात होता त्याच पद्धतीने चालवला जातो. आश्रमात जाऊन आपण इतिहासात प्रवेश करतो. ते चैतन्यशीलतेचे प्रतीक आहे. गांधीजींचे विचार आणि तत्वज्ञान या ठिकाणाच्या प्रत्येक कणात आहे. वर्धा ही शांततेची प्रयोगशाळा होती जिथे संपूर्ण देशाला आंदोलित करण्याचा प्रयत्न केला.प्रास्ताविक नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा यांनी केले. ते म्हणाले, या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बापू कुटी, पवनार आश्रम, मगन संग्रहालय, राष्ट्रभाषा प्रचार समिती, एमगिरी इत्यादी ठिकाणी नेण्यात येईल. या कार्यक्रमात डॉ. अशोक शेळके यांच्या नेतृत्वात पुण्यातील २७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांनी कुलगुरू प्रो. कृष्ण कुमार सिंह, कुलसचिव प्रो. आनन्द पाटील, डॉ. राकेश मिश्रा व जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे यांचे स्मृतिचिन्ह आणि सूतमाळ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन प्रशिक्षक सतीश इंगोले यांनी केले तर नेहरू युवा केंद्राचे लेखा अधिकारी दयाराम रामटेके यांनी आभार मानले.