🔥पतंग उडवताना विजेचा धक्का; हिंगणघाटमध्ये १६ वर्षीय मुलगा गंभीर जखमी.
हिंगणघाट -/मकर संक्रांतीच्या आनंदावर विरजण घालणारी घटना हिंगणघाट शहरातील माता मंदिर वॉर्डात घडली. पतंग उडवताना विद्युत धक्का बसून १६ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
अथर्व बाळबुदे (वय १६) हा सायंकाळी सुमारे साडेपाच वाजताच्या सुमारास आपल्या घराच्या गच्चीवर पतंग उडवत होता. यावेळी त्याची पतंग घरालगत असलेल्या झाडात अडकल्याने ती काढण्यासाठी त्याने लोखंडी रॉडचा वापर केला. मात्र, रॉडचा संपर्क घराच्या बाजूने जाणाऱ्या जिवंत विद्युत तारेस झाल्याने त्याला जोरदार विद्युत धक्का बसला.
या अपघातात अथर्वच्या उजव्या पायावरील कपड्यांना आग लागून पाय गंभीररीत्या भाजला गेला. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून धोका टळल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
या घटनेमुळे मकर संक्रांतीदरम्यान पतंग उडवताना विशेषतः गच्च्या, झाडे व विद्युत तारा असलेल्या परिसरात नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.