पत्रकारावरील हल्ला प्रकरण;सुत्रधारासह हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याची मागणी
सामाजिक संघटना, प्रेस क्लब सेलूसह नगरसेवकांचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी / सेलू :
येथील रहिवासी तथा दैनिक साहसिक व साहसिक न्युज-२४ चँनलचे मुख्य संपादक तसेच साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र कोटंबकार यांच्यावर आठ दिवसापूर्वी भ्याड असा सुनियोजित प्राणघातक हल्ला करण्यात आला. सदर हल्ल्यामागील मुख्य सुत्रधारासह हल्लेखोरांना शोधण्यात आठ दिवसानंतरही पोलीस प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळे सदर घटनेचा निषेध नोंदवून पडद्यामागील मुख्य सुत्रधारासह हल्लेखोरांना तत्काळ अटक करा या मागणीसाठी आज सोमवारी तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध सामाजिक संघटना, प्रेस क्लब सेलू व सेलू नगरपंचायतच्या नगरसेवकांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.
संपादक रविंद्र कोटंबकार सोमवार(दि.१८) रोजी आपल्या कार्यालयातील दैनंदिन कामकाज आटोपून चारचाकी वाहनाने सेलू येथील निवासस्थानी जात होते. दरम्यान दत्तपूर नजिकच्या वळणावरील बोगद्यात आधीच दबा धरून बसलेल्या १२ ते १५ हल्लेखोरांनी लाठ्याकाठ्यासह त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात त्यांच्या वाहनचालकासह ते गंभीर जखमी झाले. सध्या त्यांच्यावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर भ्याड हल्ल्याला आज आठ दिवस झाले आहेत, तरीही अद्याप हल्लेखोरांसह मुख्य सुत्रधार मोकाटच आहे. पोलीस यंत्रणा तपासाच्या नावाखाली केवळ दिशाभूल करीत असल्याचेच दिसून येते. त्यामुळे सदर घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करीत हल्ल्यामागील सुत्रधारासह हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी, याकरिता आज सोमवारी येथील नगरपंचायतच्या नगरसेवक कविता किशोर काटोले, गीता गुरुचरणसिंह रामगडीया, साहसिक जनशक्ती संघटना तसेच प्रेस क्लब सेलूच्या वतीने तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले.
यावेळी नगरसेवक कविता काटोले, गीता रामगडीया, प्रेस क्लबचे तालुका अध्यक्ष प्रफुल्ल लुंगे, उपाध्यक्ष अनिल वांदीले, राजू कोहळे, सतिश वांदीले, सचिन धानकुटे, मंगेश काळे, साहसिक जनशक्ती संघटनेचे विदर्भ संपर्कप्रमुख गणेश खोपडे, साहसिक जनशक्ती संघटनेचे युवा सेलू तालुका अध्यक्ष सागर राऊत, योगिता जगदीश पांडे, सुनिल वांदीले, प्रकाश बडेरे, बाळा टालाटूले, कलीम शेख, जगदीश पांडे, कमलेश लटारे, चेतन गोंडाणे, धीरज नरांजे, नितीन दिघडे सह अनेक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.