परळीत बोगस एन.ए. आणि ले-आऊट जोडून पाच हजार खरेदीखतांची नोंदणी
प्रतिनिधी / बीड :
परळी तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षात बोगस एन. ए. आणि ले-आउट जोडून तब्बल पाच हजार खरेदीखताची नोंदणी झाली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे अँड. परमेश्वर गीते, परळी यांनी तक्रार केल्यानंतर यात त्रिसदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. मात्र आता चौकशीचे काम थंडावले आहे. बोगसगिरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी. यातून शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे दोषींवर तात्काळ कारवाई करावी, असे ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हंटले आहे.
दुय्यम निबंधक परळी, तलाठी, मंडळ अधिकारी, दलालांशी संगनमताने तत्कालीन तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांचे सही, शिक्यांचे बोगस, खोटे व बनावट अकृषिक आदेश, जोडून पाच हजार खरेदीखताची नोंदणी केली. यातून गोरगरीब जनतेची फसवणूक करून अशा खरेदीखतांचे फेरफार मंजूर केले आहेत.
यासंदर्भात परळी येथील अँड. परमेश्वर गीते यांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. त्यावर चौकशीचे आदेश झालेले आहेत. मात्र ही चौकशी थंडावली आहे. बनावट सही शिक्यांचे अकृषिक परवानगी आदेश व नगर रचनाकार यांचे नकाशे जोडून तुकडेबंदीचा कायद्याचा यात भंग झालेला आहे. सर्व सामान्य जनतेची फसवणूक झालेली आहे.
खरेदी केलेल्या प्लॉटचे अकृषिक परवानगी आदेश व नगर रचनाकार, बीड यांचा मंजूर अभिन्यास (नकाशा) खरा असल्याची खात्री करून जनतेने खरेदीखत नोंदवणे गरजेचे असते. मात्र जनता दलालांवर विश्वास ठेवते. म्हणून जनतेची अशी फसवणूक होते. शेवटी दंड असेल व कारवाई नाहक खरेदी घेणारे लबाड ठरतात.
एवढा प्रचंड मोठा गैरप्रकार झालेला आहे. शासनाची यातून कोट्यावधी रुपयांची फसवणूक झालेली आहे. त्याच प्रमाणे गोरगरीब खरेदीदारांची पिळवणूक झालेली आहे. तुकडे बंदी कायद्या सह अन्य कायद्यांचे उल्लंघन महसूल प्रशासनाने देखील मोठ्या प्रमाणात केलेले आहे. घेतलेले फेर नियमबाह्य आहेत. अशा परिस्थितीत दोषींवर अद्यापही का कारवाई होत नाही ? हा प्रश्न उपस्थित होत असून वेळप्रसंगी यात तक्रारदारा मार्फत जनहित याचिका दाखल केली जाईल, असा इशाराही अँड. देशमुख यांनी दिला आहे.