पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना २४ तास वीज द्या – माजी आमदार प्रा.राजू तिमांडे

0

🔥पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना २४ तास वीज द्या – माजी आमदार प्रा.राजू तिमांडे

🔥माजी आमदार तिमांडे यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी.

हिंगणघाट -/ खरिपाच्या हंगामात पावसाच्या लपंडाव व खंडामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जगविण्यासाठी २४ तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून निवेदनाद्वारे विनंती केली आहे.

      खरिपाच्या हंगामात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली. जुलै महिन्यातील पावसाच्या लपंडाव व खंडामुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीचा सामना करावा लागला. कापसाच्या पिकाची लागवड पावसाच्या खंडामुळे व्यवस्थित जमली नाही. तर तुरीचे दाणे जितक्या वेळेस टोकले, तेव्हापासून पावसाचा लपंडाव व खंड तसेच किडीच्या प्रादुर्भावामुळे पीक पूर्णपणे निघाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची मेहनत व खर्चही वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

      ऑगस्ट महिन्यात पावसाच्या १५ दिवसांच्या खंडामुळे पिके मरणासन्न अवस्थेत आहेत. तर पठारी आणि मुरमाड जमिनीवरील पिके शेवटच्या घटका मोजत आहेत. सोयाबीनच्या पिकांची फुलगळ झाली असून धरलेल्या शेंगांचीही गळ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोयाबीनचे पीक संपण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांना सोयाबीनची काढणी करण्याचे कामही पडणार नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

      सध्याच्या परिस्थितीत कोरड्या दुष्काळाचे सावट शेतकऱ्यांना भेडसावत आहे. पावसाच्या खंडामुळे ५० ते ६० टक्के शेतीचे नुकसान होण्याची शक्यता असून मोठ्या प्रमाणात शेती पडीत राहण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आधीच महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि पिकांच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

       अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअरवेल अथवा इतर सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांना पिके जगविण्यासाठी वीजपुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणींचा गांभीर्याने विचार करून सिंचनासाठी २४ तास अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी केली.

      हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील ७० टक्के शेतकऱ्यांनी बेडवर कपाशीची लागवड केली, लागवड करतांना जमिनीपासून अर्ध्या फूट वर अंतरावर लागवड केली असल्याने कपाशीला पावसाची अत्यंत आवश्यकता आहे, याशिवाय शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळाल्यास उपलब्ध पाण्याचा उपयोग करून पिके वाचविणे शक्य होईल. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

       यावेळी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा करून परिस्थितीची माहिती दिली. 

         शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ईकबाल पहेलवान साहसिक News -24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!