पैनगंगा पात्रातून कोट्यवधींच्या रेतीची लूट; सत्तपल्लीत साठ्याचे ‘डोंगर’,तरीही महसूल प्रशासन सुस्त!

0

🔥पैनगंगा पात्रातून कोट्यवधींच्या रेतीची लूट; सत्तपल्लीत साठ्याचे ‘डोंगर’,तरीही महसूल प्रशासन सुस्त!

🔥​रेती तस्करांवर झरी तहसीलदारांचा ‘वरदहस्त’? तक्रारीनंतरही जिल्हाधिकारी गप्प; करोडोंच्या गैरव्यवहाराचा संशय!

​यवतमाळ- प्रतिनिधी -/ झरी जामणी तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रातून सुरू असलेली अवैध रेती तस्करी आता चव्हाट्यावर आली असून, निसर्गाच्या या लुटमारीला थेट महसूल विभागाचाच पाठिंबा मिळत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पैनगंगा नदीतून उपसा केलेली हजारो ब्रास रेती ग्राम सत्तपल्ली येथे बिनदिक्कतपणे साठवून ठेवण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या या काळ्या बाजाराकडे झरीचे तहसीलदार डोळेझाक करत असल्याने, “तस्करांना अभय देणारे महसूलचे अधिकारी नेमके कोणाच्या फायद्यासाठी काम करत आहेत?” असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.

 झरी जामणी तालुक्यातील सत्तपल्ली शिवारात पैनगंगा नदीच्या पात्रातून रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उपसा केला जात आहे. नदीचे पात्र अक्षरशः पोखरून काढले जात असून, उपसा केलेली ही रेती सत्तपल्ली येथील मोकळ्या जागेत साठवली जात आहे. घटनास्थळावर पाहणी केल्यास या ठिकाणी रेतीचे अक्षरशः मोठमोठे डोंगर उभे राहिल्याचे दिसून येते. ​साठवणूक केलेल्या या रेतीची बाजारातील किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. दररोज येथून ट्रॅक्टर आणि हायवा वाहनांच्या माध्यमातून रेतीची अवैध वाहतूक सुरू असून, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. ​गावातील जागरूक नागरिकांनी आणि स्थानिक प्रतिनिधींनी या रेती साठ्याची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी झरी जामणीच्या तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. मात्र, तक्रार देऊनही तहसीलदारांनी साधी घटनास्थळाची पाहणी करण्याची तसदी घेतलेली नाही. ​तस्करांवर कारवाई करण्याऐवजी महसूल यंत्रणेनेच त्यांच्यावर मेहेरबानी दाखवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या अजब सुस्त कारभारामुळे

🔥​रेती तस्करांचे धाडस प्रचंड वाढले आहे.

🔥​दररोज दिवसाढवळ्या रेतीची चोरी करून काळाबाजार केला जात आहे.

​शासकीय तिजोरीवर थेट दरोडा टाकला जात आहे. ​केळापूर उपविभागीय अधिकारी (SDO) तसेच यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः सत्तपल्ली येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यास या महाघोटाळ्याचे सत्य समोर येईल. मात्र, वरिष्ठ स्तरावर तक्रारी पोहोचूनही जिल्हा प्रशासनाने यावर कोणतीही कठोर पावले उचललेली नाहीत. ​जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कारवाईबाबत दाखवली जाणारी अनास्था पाहता, “या कोट्यवधींच्या साठ्यामागे जिल्ह्यापर्यंत मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे का?” अशी जाहीर शंका नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

​निसर्गाची बेसुमार हानी करून नदीचे अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या या वाळूमाफियांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून हा साठा जप्त करावा. जर येत्या २४ तासांत सत्तपल्ली येथील रेती साठ्यावर धाड टाकून कारवाई केली नाही, तर संतप्त जनता रस्त्यावर उतरून महसूल प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.(क्रमशः)

         ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!