नागपूर -/ बेलतरोडी पोलिस स्टेशनकडून जारी करण्यात आलेल्या महिला दिन कार्यक्रमाच्या प्रेस नोटमध्ये धक्कादायक चूक समोर आली आहे. या अधिकृत कागदपत्रात दिनांक ११/१३/२०२६ असा उल्लेख करण्यात आला असून, वर्षात १३ वा महिना अस्तित्वातच नसताना असा उल्लेख केल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सरकारी कार्यालयातून प्रसिद्ध होणारे दस्तऐवज अत्यंत अचूक आणि जबाबदारीने तयार केले जाणे अपेक्षित असते. मात्र बेलतरोडी पोलिस ठाण्याकडून जारी झालेल्या या प्रेस नोटमध्ये मार्च (३ रा महिना) ऐवजी १३ वा महिना दाखवला गेला, ही गंभीर प्रशासकीय चूक मानली जात आहे. कायदेशीर दृष्टिकोनातून पाहता, अशा अधिकृत कागदपत्रांतील चुकीच्या तारखा भविष्यातील नोंदी, संदर्भ आणि प्रशासनिक प्रक्रियेत गोंधळ निर्माण करू शकतात.
कायद्याच्या दृष्टीने अधिकृत दस्तऐवजातील चुकीची माहिती ही प्रशासकीय निष्काळजीपणा मानली जाऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, सरकारी कागदपत्रे जारी करण्यापूर्वी त्यांची पडताळणी करणे ही संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. त्यामुळे ही चूक केवळ टायपिंगची नसून कार्यालयीन पडताळणी प्रक्रियेवरही प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे.
दरम्यान, ही बाब समोर आल्यानंतर संबंधित विभागाने दुरुस्ती करून नवीन प्रेस नोट जारी करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. प्रशासनाच्या अधिकृत कागदपत्रात अशी चूक होणे हे नागरिकांमध्येही चर्चेचा विषय ठरत आहे.