फेक नरेटिव्हचा फुगा फुटला!…​’अमरभाऊ’ तोंडावर आपटले! ३०० खाटांच्या रुग्णालयाचे टेंडर निघाले; ‘लॉलीपॉप’ म्हणणाऱ्या खासदारांची दाणादाण!

0

🔥फेक नरेटिव्हचा फुगा फुटला!…​’अमरभाऊ’ तोंडावर आपटले! ३०० खाटांच्या रुग्णालयाचे टेंडर निघाले; ‘लॉलीपॉप’ म्हणणाऱ्या खासदारांची दाणादाण!

🔥’अमरभाऊ’ आमदारांच्या ‘लॉलीपॉप’ची ‘कॅडबरी’ झाली!

🔥१५५ कोटींच्या रुग्णालयाचे टेंडर सुटले; खासदारांचा ‘फेक नरेटिव्ह’ उघड.

वर्धा -/ निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय नेत्यांकडून अनेकदा दावे-प्रतिदावे केले जातात. मात्र, वर्धा लोकसभेचे खासदार अमर काळे यांनी तळेगाव येथील ३०० खाटांच्या नियोजित जिल्हा रुग्णालयाबाबत केलेले विधान आता त्यांच्यावरच उलटल्याचे दिसत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान काळे यांनी या रुग्णालयाच्या घोषणेला ‘भाजपचे लॉलीपॉप’ असे संबोधून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली होती. मात्र, आता याच रुग्णालयाच्या कामाची अधिकृत टेंडर नोटीस प्रसिद्ध झाल्याने काळेंचा तो दावा सपशेल फोल ठरला असून सोशल मीडियावर त्यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे.

एका जाहीर सभेत बोलताना खासदार अमर काळे यांनी आमदार सुमित वानखेडे आणि राज्य सरकारवर निशाणा साधताना म्हटले होते की, “तळेगावला ३०० खाटांचे रुग्णालय होणार, हे केवळ निवडणुकीच्या तोंडावर दिलेले लॉलीपॉप आहे.” या प्रकल्पाची खिल्ली उडवत हे रुग्णालय कधीही प्रत्यक्षात येणार नाही, असा सूर त्यांच्या भाषणातून उमटला होता. राजकीय जीवनात जनतेला केवळ आश्वासनांवर ठेवणाऱ्यांना इतरांच्या कर्तृत्वाबद्दलही तसाच गैरसमज होतो, हेच या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून ‘फेक नरेटिव्ह’ पसरवण्याचा हा प्रयत्न आता नागरिकांच्या लक्षात आला आहे.

तळेगाव हे नागपूर, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांच्या मध्यभागी असल्याने येथे अत्याधुनिक रुग्णालय व्हावे, हे आमदार सुमित वानखेडे यांचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी केवळ घोषणा न करता शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. आमदार वानखेडेंच्या या जिद्दीमुळेच केवळ मंजुरीच मिळाली नाही, तर तब्बल १५५ कोटी ८४ लाख रुपयांचा निधीही त्यांनी खेचून आणला. आज या कामाची अधिकृत ई-निविदा (E-Tender Notice No. 08/2025-26) प्रसिद्ध झाल्याने हे स्वप्न आता प्रत्यक्ष साकार होण्याच्या दिशेने वेगाने पाऊल पडले आहे. या अधिकृत सरकारी निर्णयामुळे खासदार अमर काळेंच्या टीकेतील हवाच निघून गेली असून, “आता लॉलीपॉप कोणी चघळायचा?” असा खोचक सवाल विचारला जात आहे.

सोशल मीडियावर सध्या अमर काळेंच्या त्या भाषणाचा व्हिडिओ आणि सरकारी टेंडरची प्रत यांचे ‘कोलाज’ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ‘कामाला क्षमता लागते, केवळ टीका नाही’ अशा कमेंट्सचा पाऊस पडत असून, या संपूर्ण प्रकरणामुळे खासदार अमर काळे यांची राजकीय कोंडी झाली आहे. विकासाच्या आड येणारे आणि दिशाभूल करणारे विधान करणे खासदारांना शोभत नाही, अशी चर्चा आता संपूर्ण वर्धा जिल्ह्यात रंगली आहे. सुमित वानखेडेंनी प्रत्यक्ष कामातून उत्तर दिल्याने विरोधकांचे खोटे दावे आता जनतेसमोर उघडे पडले आहेत.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!