उमरखेड -/उमरखेड तालुक्यातील महसूल प्रशासन आणि सत्ता पक्षातील शिर्षस्थ ‘नेते’ यांच्या कुटील संगनमातून उमरखेड तालुक्यातील बोरी-चातारी, दिघडी देवसरी,कारखेड, बेलखेड,मारलेगाव, लिंबगव्हाण,हातला जनूना कोपरा (बु.) इत्यादी रेती घाटावरून नियमांना अव्हेरून उत्खनन केले जात आहे. खासकरून रॉयल्टी (वाहतूक पास) उपलब्ध नसताना बनावट पासच्या माध्यमातून रेतीची विल्हेवाट लावली जात आहे.
उमरखेड तालुक्यात रेती माफियांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून मनमर्जीने अवैध वाहतुकीतून प्रचंड प्रमाणात पैनगंगेच्या खोऱ्यात रेतीचा उपसा सुरू आहे. रात्रंदिवस नियमांना झुगारून कथित राजकीय पक्षांचे ‘म्होरके’ असल्याच्या अविर्भावात या तस्करांचा जणू रेतीघाटांवर वावर आहे. विशेष
म्हणजे या तस्करांच्या टोळक्याला ‘माध्यम’ वर्तुळात मिरविणाऱ्या परंतु अवैध व्यवसायात गुंतलेल्या एका जोडगोळीचे जुगार, ‘पाठबळ’ आहे. मटका, पत्तेजुगार पाठोपाठ आता थेट रेती तस्करीत हात ‘ओले’ करून ही जोडगोळी आपले ‘दिव्य’ प्रताप पार पाडत आहेत. शिवाय या जोडगोळीला पुरक असलेले आणि पोलीस दप्तरी शिरावर गंभीर गुन्ह्यांची
नोंद राहिलेल्या तस्करांची यामध्ये थेट भागिदारी आहे. वास्तविक उमरखेड तालुक्यात यापूर्वीही मोठ्या
प्रमाणात रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. परंतु हे प्रकार नित्याचेच झाले असतानाच बोरी-चातारी दिघडी,देवसरी,कारखेड, लिंबगव्हाण,हातला जनुना,कोपरा (बु.)या रेतीघाटावर सुरू असलेली माफियांची गुंडागर्दी स्थानिक प्रशासनाला आव्हान देणारी ठरते आहे.
मागील वर्षी याच माफियांच्या टोळक्यातील काही सदस्यांकडून अग्निशस्त्रांचा खुलेआम वापर झाला होता. जणू कायदा आपल्या खिशात असल्यागत या माफियांचा पंचक्रोषित वावर असतो. आताही हाच प्रकार बोरी, चातारी, कारखेड, देवसरी, दिघडी, लिंबगव्हाण, मारलेगाव, हातला, -जनुना, यासह विविध भागात सुरू असून महसूल प्रशासन ‘पायाशी’ असल्यागत या माफियांचा मुक्तसंचार आहे.
रेतीचा उपसा दुसऱ्या घाटावरून आणि रॉयल्टी मात्र तिसऱ्याच घाट स्थळाची असा शासनाचा महसूल बुडविणारा प्रकार खुलेआम उमरखेड तहसीलदाराच्या नाकावर टिच्चून सुरू आहे. येथील तहसीलदार स्वतः ‘स्वच्छ’ प्रतिमेचे असल्याचा नेहमी शासन दरबारी कांगावा करतात. परंतु या तस्करांच्या मनसुब्यात त्यांचे कांगावे पार धुळीस मिळाले आहेत.
🔥वादग्रस्त ‘लाला’शी ‘समन्वय’ साधणारा नेता कोण?
उमरखेड, पुसद आणि महागाव या तीनही तालुक्यात खासकरून रेती तस्करीत ‘लाला’चा पत्ता चालतो. सत्ताधारी नेत्यांना ‘ब्लाईड’ पार्टनर करून त्याचे अवैध धंद्यांचे कारनामे सर्वश्रुत आहेत. शिवाय माध्यमातील जोडगोळी सोबत असल्याने अशांचे चांगलेच फावते. हाच प्रकार बोरी, चातारी, देवसरी, निगडी, कारखेड, लिंबगव्हाण, मारलेगाव, हातला,-जनुना या पैनगंगा नदीपात्रातील रेतीघाटावर सुरू असून बनावट रॉयल्टीतून पाठबळ देणारा हा समन्वयक ‘नेता’ कोण, असा सवाल पर्यावरणप्रेमीमधूनच नव्हे तर सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.(क्रमशः)