बाभुळगाव तालुक्यात महसूल व पोलिसांच्या संगनमताने रेतीघाटांचा ‘अघोषित लिलाव’

0

🔥ह्याच त्या सौभाग्यवती मीरा किशोर पागोरे तहसीलदार बाभूळगाव जिल्हा यवतमाळ.🔥ह्याच त्या पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे पोलीस स्टेशन बाभूळगाव जिल्हा यवतमाळ

🔥बाभुळगाव तालुक्यात महसूल व पोलिसांच्या संगनमताने रेतीघाटांचा ‘अघोषित लिलाव’

🔥​वर्धा, बेंबळा नदीपात्रातून रात्रंदिवस कोट्यवधींची लूट सुरूच

🔥​जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतरही वसुली यंत्रणा पुन्हा जोमात; टोळीयुद्ध पेटण्याची चिन्हं

​प्रतिनिधी,यवतमाळ -/शासकीय नियमांची पायमल्ली करत आणि जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत बाभुळगाव तालुक्यात रेतीचा उघड ‘अघोषित लिलाव’ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तहसीलदार मीरा पागोरे आणि बाभुळगाव पोलिस ठाण्याच्या ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या थेट आशीर्वादाने हा संपूर्ण काळाबाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे. तालुक्यात ज्याचे जास्त पैसे, त्याला रेतीघाट बहाल केला जात असल्याने सध्या बाभुळगाव हे यवतमाळ जिल्ह्यातील बेकायदेशीर रेती उपशाचे प्रमुख केंद्र बनले आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी स्वतः घटनास्थळी धाड टाकून कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतरही स्थानिक अधिकाऱ्यांचे वसुली रॅकेट पुन्हा सक्रिय झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

बाभुळगाव तालुक्यातील वर्धा आणि बेंबळा या नद्यांच्या पात्रातून नैसर्गिक साधनसंपत्तीची अक्षरशः लूट सुरू आहे. तालुक्यातील नांदेसावंगी, मुबारकपूर, वाटखेड, मांगसावंगी आणि तांभा या प्रमुख घाटांवरून दिवसरात्र बेसुमार रेती उपसा केला जात आहे. आधुनिक पोकलेन, जेसीबी आणि डंपरच्या साहाय्याने हजारो ब्रास रेतीची दररोज वाहतूक होत असून नदीपात्रांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. कोणताही अधिकृत लिलाव झालेला नसताना केवळ प्रशासकीय संगनमताने हे घाट विशिष्ट तस्करांच्या घशात घालण्यात आले आहेत.

‘ज्याचे जास्त पैसे, त्याचा घाट’ अशी छुपी बोली लावून तालुक्यात रेतीचे वाटप केले जात असल्याने रेती तस्करांचे चांगलेच फावले आहे. यातून तालुक्यात तस्करांच्या दोन मोठ्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. या टोळ्यांमध्ये रेती उपसा आणि वाहतुकीवरून तीव्र स्पर्धा सुरू आहे. ओव्हरलोड वाहनांची बेदरकार वाहतूक ग्रामीण रस्त्यांवर सुरू असून यामुळे सामान्य नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. वर्चस्वाच्या वादातून या टोळ्यांमध्ये कधीही रक्तरंजित संघर्ष भडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

या काळ्याबाजाराची व्याप्ती इतकी वाढली आहे की, एका राजकीय पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने थेट तहसीलदार मीरा पागोरे यांना निवेदन सादर केले. “जर इतरांना पैसे घेऊन घाट दिले जात असतील, तर आम्हालाही असाच घाट हर्रास (लिलाव) करून द्यावा,” अशी उपरोधिक व थेट मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. या अजब मागणीमुळे महसूल व पोलिस प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे तालुक्यात निघाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

काही दिवसांपूर्वी यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बाभुळगाव तालुक्यात अचानक धाड टाकून बेकायदेशीर रेती वाहतूक करणारे दोन ट्रक प्रत्यक्ष पकडले होते. या वेळी त्यांनी घटनास्थळी तहसीलदार मीरा पागोरे आणि ठाणेदार दीपमाला भेंडे यांना पाचारण करून संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे तसेच अवैध उपसा पूर्णपणे बंद करण्याचे सक्त आदेश दिले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी पाठ फिरवताच परिस्थिती पूर्वपदावर आली. जिल्हाप्रमुखांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत या दोन्ही अधिकाऱ्यांचे तथाकथित ‘वसुली प्रतिनिधी’ पुन्हा सक्रिय झाले असून दररोज लाखो रुपयांची लाच गोळा केली जात असल्याची चर्चा उघडपणे सुरू आहे.

शासकीय महसुलावर डल्ला मारून स्थानिक पातळीवर समांतर व्यवस्था उभी करण्यात आली आहे. दिवसरात्र होणाऱ्या या उपशामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असताना स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपत्तीत मात्र प्रचंड भर पडत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईलाही न जुमानणाऱ्या या भ्रष्ट साखळीवर आता वरिष्ठ पातळीवरून काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बाभुळगावमधील संभाव्य टोळीयुद्ध आणि रस्ते अपघात टाळण्यासाठी गृह व महसूल विभागाने तात्काळ कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.(क्रमशः)

          ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!