मातृभाषा ही ज्ञानभाषा असावी : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत कुलगुरूंचे प्रतिपादन
परळी वैजनाथ / महादेव गिते
येथील कै .लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात परळी व परळी परिसरातील महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या प्रबोधनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. प्रमोद येवले यांनी विशेष सत्र बोलाविले होते.यात त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
शैक्षणिक धोरण म्हणजे केवळ शिक्षणपद्धतीत बदल असा नव्हे तर लोकांच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीमध्ये कसा बदल घडवून आणता येईल याचा सर्वांगीण विचार नवीन शैक्षणिक धोरणात करण्यात आलेला आहे.शिक्षणानेच समाजात पूर्ण क्रांती घडू शकते.त्यासाठी काळाला अनुसरून असे बदल शैक्षणिक धोरणात करणे गरजेचे असते आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्याची चोख अंमलबजावणीही महत्त्वाची आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षणक्षेत्राशी निगडीत असलेल्या व्यक्तींसोबतच पंचायत समिती इत्यादी समाजघटकांनी नोंदवलेली मतं विचारात घेतली आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाचं वैशिष्ट्य म्हणजे निवड आधारित क्रेडिट प्रणाली (CBCS )या अंतर्गत विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय निवडण्याची मुभा असणार आहे, ते अधिक लवचिक करण्याचा प्रयत्न या नवीन शिक्षण प्रणालीत करण्यात आला आहे. संशोधनावर आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांवर या शिक्षण प्रणालीत अधिक भर देण्यात आला आहे. कौशल्याधारित शिक्षणावर अधिक भर या नवीन प्रणालीत असणार आहे . इत्यादी अनेक मुद्दे त्यांनी सविस्तर पद्धतीने त्यांच्या वक्तव्यात मांडले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख हे होते. तर संस्थेचे सचिव रवींद्र देशमुख व कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली . या व्यतिरिक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नरेंद्र काळे व्यवस्थापन परिषदेचे दुसरे सदस्य बाजीराव भैय्या धर्माधिकारी विद्या परिषदेचे सदस्य डॉ. पी. एल. कराड व सिनेट सदस्य डॉ .धोंडगे या प्रसंगी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. मेश्राम , डॉ. सय्यदा , डॉ. कदम ,डॉ. घुमरे , डॉ. रेड्डी डॉ. होळंबे , दळवेसर , देवर्षे , फुलारी, नजीर शेख आदि प्राचार्य उपस्थित होते. याशिवाय परळी परिसरातील अनेक महाविद्यालयाचे प्राध्यापक या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.एस. मुंडे यांनी केले. अध्यक्षीय समारोप संस्थेचे सचिव रवींद्र देशमुख यांनी केला. यात त्यांनी स्व.शामराव देशमुख यांचे काव्यमय वर्णन करताना म्हटले…
‘दिलखुलास व्यक्तिमत्त्व , आपुलकी त्यांचे तत्व । माणुसकीची जाण ,
स्वाभिमान हाच सन्मान । उत्तम शैक्षणिक नीती,
महिला शिक्षणाची जनजागृती |
सदैव उमेदीची भाषा ,
कधी न केली निराशा |
मनात प्रसन्नतेचा भाव , त्यांच्या प्रति सदैव आदरभाव॥
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ राजकुमार यल्लावाड आणि प्रा.डॉ. विनोद जगतकर यांनी केले तर आभार प्रा. डॉ. विनोद जगतकर यांनी मानले.