सेलू, / शासनाच्या शालेय विभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान नुकतेच राबविण्यात आले. शाळेमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्त्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. विविध स्पर्धा व उपक्रमांची नोंद घेऊन ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानात स्थानिक दीपचंद चौधरी विद्यालय ही खाजगी व्यवस्थापनाच्या गटातून सेलू तालुक्यात पहिल्या क्रमांकाची शाळा ठरली आहे.
राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक तालुकास्तरावर ही स्पर्धा घेण्यात आली. यात दीपचंद चौधरी विद्यालय तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, प्रबोधनात्मक सुविचार चित्रांच्या माध्यमातून भिंतींना बोलते केले. यामध्ये शाळेच्या आवारातील ठिकठिकाणच्या वारली कलाकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या. विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ व बाल संसद स्थापन करून त्यांच्या माध्यमातून शाळेतील कामकाज करणे, प्रधानमंत्री पोषणशक्ती योजना, परसबागेतील आरोग्यदायी भाज्यांची लागवड, ‘मेरी माटी-मेरा देश’, ‘बचत बँक’ सारखे उपक्रम, नवसाक्षरता अभियान, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण, महावाचन चळवळ अंतर्गत उपक्रम, व्याख्यान, वक्तृत्त्व, चित्रकला, लेखन-संगीत, क्रीडा स्पर्धा, एन.सी.सी. यांच्या माध्यमाने होणारा सर्वांगीण विकास, आरोग्य तपासणी, किशोरवयीन मुलांसाठी समुपदेशन, स्वयंरोजगारासंबंधीचे मार्गदर्शन, प्रात्यक्षिक, व्यवहार कौशल्य, लोकसहभागातून शाळेला मिळालेल्या वस्तू, तंबाकू विरोधी जनजागरण, प्लास्टिक निर्मूलन या संबंधीची जाणीवजागृती करण्यात आली. वर्गखोल्या तसेच शालेय परिसर स्वच्छता करण्यासाठी मॉनिटर नेमून प्रत्येक विद्यार्थ्याला संधी देण्यात आली. अशा विविधांगी उपक्रमांच्या माध्यमातून शाळेच्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास व क्रीडा क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर कमावलेल्याला नैपुण्याच्या जोरावर ही शाळा ‘स्मार्ट शाळा’ ठरली आहे. शासनस्तरावरून याची दखल घेत तालुक्यातून “माझी शाळा, सुंदर शाळा” या अभियानात दीपचंद चौधरी विद्यालयाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
या सर्व उपक्रमात शाळेच्या प्राचार्या सौ. एस. बी. पोहाणे (वंजारी) यांनी वैयक्तिकरित्या नियोजन व अंमलबजावणी करून शाळेला वैभव मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. या अभियानात संस्थेचे पदाधिकारी नवीनबाबू चौधरी, अनिलबाबू चौधरी, युवराज राठी व इतर पदाधिकाऱ्यांचे विशेष लक्ष व मार्गदर्शन असल्याने मोठे योगदान लाभले. तालुक्यात शाळेला प्रथम मिळाल्याने प्राचार्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक करून सर्वांचे अभिनंदन केले. यासाठी डॉ. कल्पना मकरंदे, व्ही. एम. चांदेकर, जी. बी. खंडागळे, प्रा. मंगेश वडुरकर यांनी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून हे अभियान यशस्वीरीत्या व समर्थपणे राबविले. या अभियानात एच. जे. मुडे, हेमंत घोडमारे, कलाशिक्षक सुभाष राठोड, प्रशांत चव्हाण, यु. व्ही. पिंपरापुरे, प्रवीण घोडखांदे, संजय बारी, डी. पी. झाडे, मीनाक्षी सोमनाथे, शशांक हुलके, मुकेश इंगोले, अनिल धापुडकर, लीना भोमले, तुषार धर्मुळ,एस. बी. करडे, ज्योती उमाटे, सचिन तेलरांधे, मिथुन हांडे यांचेसह सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तसेच सर्वच विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.