🔥यवतमाळ हादरले! तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या HOD कडून विद्यार्थिनीचा विनयभंग; संतप्त विद्यार्थ्यांनी बदडले! 🔥थेट मंत्र्यांच्या निकटवर्तीयावरच टाकला हात; लोहारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू,राजकीय वर्तुळात खळबळबळ!
यवतमाळ -/विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना आज यवतमाळच्या अमरावती रोडवरील एका नामांकित उच्च तंत्रशिक्षण महाविद्यालयात घडली. येथील केमिकल डिपार्टमेंटच्या विभाग प्रमुखाने (HOD) आपल्याच विद्यार्थिनीला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवून तिचा छळ केला आणि आज थेट लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या नराधम शिक्षकाचा डाव त्याच्यावरच उलटला. संतप्त विद्यार्थ्यांनी या विकृत प्राध्यापकाला त्याच्याच केबिनमध्ये घुसून चांगलाच चोप दिला. ही पीडित तरुणी जिल्ह्यातील एका बड्या मंत्र्यांची निकटवर्तीय असल्याची माहिती समोर येत असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठा भूकंप झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती रोडवर असलेल्या या तंत्रशिक्षण महाविद्यालयातील केमिकल डिपार्टमेंटचा HOD गेल्या काही दिवसांपासून एका विद्यार्थिनीला वैयक्तिक मोबाईलवर अश्लील मेसेज आणि आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवून मानसिक त्रास देत होता. सुरुवातीला बदनामीच्या भीतीने पीडितेने याकडे दुर्लक्ष केले, मात्र या शिक्षकाची हिंमत दिवसागणिक वाढतच गेली.
आज, २ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी, या नराधम HOD ने सर्व मर्यादा ओलांडत पीडित विद्यार्थिनीशी तिच्या संमतीशिवाय लगट करण्याचा आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. ही बाब महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच त्यांनी पीडितेची विचारपूस केली. यावेळी पीडितेने डोळ्यात पाणी आणून आपल्या मोबाईलमधील ते अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पुराव्यासहित विद्यार्थ्यांना दाखवले. आपल्याच मैत्रिणीसोबत झालेला हा नीच प्रकार पाहून विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला.
विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा एक मोठा गट तातडीने संबंधित HOD च्या केबिनमध्ये घुसला. विद्यार्थ्यांनी त्याला मेसेजबाबत जाब विचारला असता, त्या नराधमाने माफी मागण्याऐवजी उलट उत्तरे देत उद्धटपणा केला. यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी कायद्याची वाट न पाहता ‘ऑन द स्पॉट’ न्याय करत त्या विकृत प्राध्यापकाला लाथाबुक्क्यांनी आणि चपलेने तुडवले. या धुलाईचा व्हिडिओ काही विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये कैद केला असून, तो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.
या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. पीडित विद्यार्थिनी ही यवतमाळ जिल्ह्यातील एका वजनदार मंत्री महोदयांची अत्यंत जवळची नातेवाईक किंवा निकटवर्तीय असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच संबंधित मंत्र्यांच्या पीएने (खाजगी सचिव) तातडीने महाविद्यालयात धाव घेतली. त्यामुळे कॉलेज प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. सत्तेत असलेल्या मंत्र्यांच्या घरातच हात टाकण्याची हिंमत या शिक्षकाने केल्यामुळे आता पोलीस प्रशासनही प्रचंड ॲक्शन मोडमध्ये आले आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून लोहारा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. एवढेच नव्हे तर, प्रकरण संवेदनशील असल्याने स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांनी महाविद्यालयात जाऊन चौकशी केली. या प्रकरणातील आरोपी HOD ला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.
यवतमाळमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थिनींच्या शोषणाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही याच तंत्रनिकेतन विद्यालयाच्या संचालकाच्या शाळेत अशाच प्रकारची एक घृणास्पद घटना घडली होती. त्यावेळी संपूर्ण जिल्हा रस्त्यावर उतरला होता आणि मोठा जनक्षोभ उसळला होता. आता पुन्हा एकदा त्याच संस्थेशी निगडित महाविद्यालयात हा प्रकार घडल्याने “विद्यार्थिनींनी सुरक्षित कुणाकडे पाहायचे?” असा संतप्त सवाल पालक वर्गातून उपस्थित केला जात आहे.
सध्या हे प्रकरण ‘गुलदस्त्यात’ ठेवण्याचा प्रयत्न महाविद्यालयाकडून केला जात असला, तरी विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा पाहता हे शक्य दिसत नाही. मंत्र्यांचे नाव यात आल्याने आता पोलीस यावर काय कारवाई करतात आणि त्या विकृत HOD वर कठोर गुन्हा दाखल होतो की नाही, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सध्या महाविद्यालयात तणावपूर्ण शांतता असून, लोहारा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या नराधम शिक्षकाचे निलंबन आणि अटक होईपर्यंत विद्यार्थी मागे हटणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.(क्रमशः)