🔥यवतमाळच्या रेमंड कंपनीतील कामगारांच्या उपोषणाची शासनाकडून दखल; आ. बाळासाहेब मांगुळकर यांनी घेतली कामगार मंत्र्यांची भेट.
🔥प्रलंबित मागण्या आणि वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन स्तरावर हालचाली; आ. मांगुळकर यांची मुंबईत ना. आकाशजी फुंडकर यांच्याशी सविस्तर चर्चा.
यवतमाळ -/यवतमाळ येथील ‘रेमंड युको डेनिम प्रायव्हेट लिमिटेड’ (Raymond UCO Denim Pvt. Ltd.) कंपनीतील कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेल्या उपोषणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी आज मुंबई येथे राज्याचे कामगार कल्याण मंत्री ना. श्री. आकाशजी फुंडकर यांची भेट घेऊन कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक हस्तक्षेप करावा, अशी आग्रही मागणी आमदार मांगुळकर यांनी केली.
यवतमाळ येथील रेमंड युको डेनिम कंपनीतील कामगार गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आणि वेतनाच्या प्रश्नावरून उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनामुळे कामगारांमध्ये असंतोष असून उद्योगावरही याचा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी आज थेट मंत्रालयात कामगार मंत्री आकाशजी फुंडकर यांची भेट घेऊन या प्रश्नावर ठोस भूमिका माडली. या भेटीदरम्यान आमदार मांगुळकर यांनी मंत्री महोदयांना अवगत केले की, कंपनीतील कामगारांचे वेतन आणि इतर कायदेशीर हक्कांचे प्रश्न प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. कामगारांच्या या न्याय्य मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने तोडगा काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
🔥संयुक्त बैठकीचे नियोजन.
आमदार मांगुळकर यांनी विनंती केली की, कंपनी प्रशासन आणि कामगार प्रतिनिधी यांच्यात तातडीने एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी. “कामगारांचे हित अबाधित ठेवत उद्योगही सुरळीतपणे चालणे जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे सामंजस्याच्या भूमिकेतून लवकरात लवकर मार्ग काढण्यात यावा,” असे त्यांनी यावेळी नमूद केले.
🔥शासनाचा सकारात्मक प्रतिसाद.
कामगार मंत्री ना. आकाशजी फुंडकर यांनी आमदार मांगुळकर यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत, या प्रकरणात शासन स्तरावरून सकारात्मक हस्तक्षेप करण्याचे आश्वासन दिले आहे. कामगारांच्या प्रश्नावर योग्य तो निर्णय घेऊन हा पेच लवकरात लवकर सोडवला जाईल, असे संकेतही मंत्र्यांनी दिले आहेत. या भेटीमुळे आता रेमंड कंपनीतील कामगारांच्या आंदोलनाला यश मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.