🔥शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात..🔥आता प्रतीक्षा पावसाची
सिंदी (रेल्वे), साहसीक न्यूज प्रतिनिधी दिनेश घोडमारे,-/ जून महिन्यात खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी शेती नागरून, वखरुन सज्ज केली आहे. मृग नक्षत्र शुक्रवारपासून सुरू झाले असून पाच दिवस झाले. मात्र, अद्याप तरी जिल्ह्यात म्हणावा तसा मोठा पाऊस झाला नाही. चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरीच नव्हे तर नागरिक सुध्दा असल्याचे दिसून येत आहे.कधी नव्हे असा उन्हाळा यावर्षी नागरिकांना सहन करावा लागला. पारा थेट ४१ ते ४५ अंशांपर्यंत राहिला. प्रचंड उकाडा लोकांच्या नशिबी आला. कितीही उन्ह असली तरी शेतकऱ्यांना आपल्या नवीन खरीप हंगामाचे नियोजन एप्रिल मे महिन्यात करावे लागते. यावेळी सुध्दा शेतकऱ्यांनी नांगरणी आणि रोटावेटर मारून आपली शेतीमशागतीचे कामे पूर्ण केली. शुक्रवार दि. ७ जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे. दि. २० जूनपर्यंत मृग नक्षत्र राहणार आहे. दि. २१ जूनपासून आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ होणार आहे. बहुतांश शेतकरी मृग नक्षत्रावर कपाशी व तुरीची लागवड करतात. चांगला व दमदार पाऊस झाल्यावर सोयाबीनची पेरणी करतात. अनेक उन्हाळे आणि पावसाळे पाहिलेला शेतकरी अनुभवातून खूप हुशार झाला आहे. आता पाऊस सुध्दा पूर्वीसारखा राहिला नाही. केव्हा हुलकावणी देऊन आर्थिक गणित बिघडवेल, याचा भरवसा नाही. त्यामुळे चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. जिल्ह्यात खरिपातील मुख्यपिक सोयाबीन, कपाशी, तूर हीच महत्त्वाची आणि नगदी पिके असल्याने याकडेच शेतकऱ्यांचा कल आहे.(मृग नक्षत्रात पेरणी केल्यास पिकाचे उत्पादन भरघोस.)
पावसाचे मृग नक्षत्र हे महत्त्वाचे असते अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याचे संकेत असल्याने शेतकऱ्याच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. उन्हापासून बेजार झालेल्या नागरिकांनाही दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मृग नक्षत्रात पेरणी केल्यास उत्पादन भरघोस मिळत असते, असा शेतकऱ्याचा अनुभव आहे. त्यामुळे शेतकरी मृग नक्षत्रात पावसाची चातक पक्ष्यासारखे प्रतीक्षा करतात. हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्याना आता मृगधाराची प्रतीक्षा आहे.
(बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धडपड.)
पारंपारिक पद्धतीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. तांत्रिक पद्धतीने शेतकरी शेती करीत आहेत. त्यामुळे बी-बियाणे खरेदीसाठी शेतकरी कृषि केंद्रावर गर्दी करीत आहेत. बहुतांश शेतकऱ्यांकडे बियाणे घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे कृषि केंद्र संचालकाकडे उधारी बी-बियाणे घेण्यासाठी मनधरणी करीत आहेत.