वडधामना येथे प्रायव्हेट स्कूल बस चालकांचा मनमानी कारभार; पालकांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट असल्याचा आरोप….

0

🔥वडधामना येथे प्रायव्हेट स्कूल बस चालकांचा मनमानी कारभार; पालकांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट असल्याचा आरोप.

 हिंगणा -/ नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील वडधामना गावात शाळेसाठी चालणाऱ्या प्रायव्हेट बस वाहतुकीबाबत गंभीर तक्रारी समोर येत आहेत. काही प्रायव्हेट बस चालक व मालकांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मनमानी पद्धतीने पैसे वसूल केले जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विशेष म्हणजे, ज्या महिन्यात विद्यार्थी पूर्ण महिनाभर बस सेवा वापरत नाही, त्या महिन्याचेही पूर्ण शुल्क जबरदस्तीने मागितले जात असल्याची माहिती पालकांनी दिली आहे. यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

पालकांच्या म्हणण्यानुसार, बसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरीही शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना योग्य वेळी घरी सोडणे ही बस चालकांची जबाबदारी आहे. मात्र अनेक वेळा बस वेळेवर येत नाही किंवा विद्यार्थ्यांना उचलण्यासाठी जात नाही, अशीही तक्रार करण्यात आली आहे. तरीसुद्धा पालकांकडून पूर्ण महिन्याचे पैसे घेण्याचा आग्रह धरण्यात येत असल्याने हा प्रकार सरळसरळ आर्थिक शोषण असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

यासोबतच बसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे नियम पाळले जात आहेत का, याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शालेय वाहतुकीसाठी शासनाने घालून दिलेले सुरक्षा नियम, चालकांची पात्रता, बसची फिटनेस, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुविधा यांची तपासणी केली जात आहे का, याबाबतही पालकांनी प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे वडधामना परिसरातील अनेक पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांचे पालक आनंद कोंडलकर यांनी या संदर्भात शाळेच्या प्रिन्सिपॉल यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर संदेश पाठवून प्रायव्हेट बस चालकांच्या मनमानी कारभाराकडे लक्ष वेधले असल्याची माहिती समोर आली आहे. या संदेशामध्ये बस चालकांकडून विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या कथित लुटीचा उल्लेख करण्यात आला असून, सर्व पालकांनी एकत्र येऊन याला विरोध करावा तसेच शाळा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच बसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत का, याची तपासणी करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांच्या नावावर आर्थिक लूट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही पालकांकडून केली जात आहे. या प्रकरणात शाळा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालून योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

          गजानन ढाकूलकर               साहसिक News-/24 हिंगणा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!