वर्ध्यात कोरोनाच्या नव्या निर्बंधाची जिल्ह्यात अंमलबजावणी
प्रतिनिधी/ वर्धा:
ओमायक्राँनसह डेल्टाचे रुग्ण राज्यात वाढत असल्याने तसेच येत्या काळात सण, उत्सवांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता पाहता शासनाने नव्याने निर्बंध लागू केले आहे, सदर निर्बंधाची जिल्ह्यातही काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.
नव्या नियमावली प्रमाणे जिल्ह्यात रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई राहील. लग्न समारंभात शंभर लोकांनाच उपस्थित राहता येईल. समारंभ मोकळ्या जागेत असल्यास 250 व्यक्ती किंवा क्षमतेच्या 25 टक्के लोकांना उपस्थित राहता येतील. सामाजिक, धार्मिक, राजकीय अशा कार्यक्रमांना सुध्दा उपस्थितीचे हेच निर्बंध असतील. अन्य समारंभास क्षमतेच्या 50 टक्के तर मोकळ्या ठिकाणी 25 टक्के उपस्थितीचे बंधन राहतील. क्रीडा स्पर्धांना सुध्दा 25 टक्केची मर्यादा असेल.
उपहारगृह, चित्रपट व नाट्यगृहांमध्ये पुर्वीप्रमाणे 50 टक्के उपस्थितीचे निर्बंध लागू राहतील. उपहारगृहांची क्षमता निश्चित करुन मालकांना तसा फलक दर्शनी भागावर लावावा लागणार आहे. नाताळच्या दिवसांमध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जावी. क्षमतेच्या पन्नास टक्के उपस्थितीचे बंधन आहे. याशिवाय सामाजिक अंतर पाळले जावे. नाताळसाठी शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन करावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.