🔥वाधवाणी फार्मसी कॉलेजच्या बेजबाबदार व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी🔥हेच ते फार्मशी कॉलेज चे प्राचार्य जगदीश वाधवानी🔥पालकांची मागणीबोरगाव धरणात दोन विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू
यवतमाळ (विशेष प्रतिनिधी) -/स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला यवतमाळमधील बोरगाव धरण परिसरात घडलेल्या एका भीषण घटनेत दोन फार्मसी विद्यार्थिनींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये अमृता अशोक खेडकर (वय २०, रा. महात्मा फुले कॉलेजसमोर, धामणगाव रोड, यवतमाळ) आणि मोहिनी गौत्रे (वय २०, रा. भोसा रोड, यवतमाळ) यांचा समावेश आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांसह मृत मुलींच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. मात्र, या संपूर्ण प्रकरणात वाधवाणी फार्मसी कॉलेज प्रशासनाची निष्काळजी आणि पोलिसांची संशयास्पद मवाळ भूमिका उघडकीस आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी दुपारी ४:०० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एकीकडे महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी आणि सजावट सुरू असताना, दुसरीकडे कॉलेज वेळेत या विद्यार्थिनी इतर मुलांसोबत कोणतीही पूर्वपरवानगी न घेता थेट बोरगाव धरण परिसरात कशा पोहोचल्या, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची आणि देखरेखीची जबाबदारी असलेल्या संस्थाचालक व प्राचार्यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी दोन्ही विद्यार्थिनींचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात सध्या केवळ आकस्मिक मृत्यूची (AD) नोंद करण्यात आली आहे. मात्र, इतकी गंभीर घटना घडूनही ग्रामीण ठाणेदार प्रवीण मानकर आणि जमादार लोथे यांनी संबंधित कॉलेजच्या संचालकांविरोधात कोणतीही कठोर कारवाई अथवा चौकशी सुरू केली नाही, असा थेट आरोप संतप्त नातेवाइकांनी केला आहे.
वाधवाणी फार्मसी कॉलेजच्या व्यवस्थापनावर यापूर्वीही विविध कारणांवरून टीका झाली असून, संस्थाचालक जगदीश वाधवाणी आणि संबंधित व्यवस्थापन या प्रकरणात आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. स्थानिक सूत्रांनुसार, ‘गुल्लू वाधवाणी’ हे या प्रकरणात थेट हस्तक्षेप करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे “लाखो रुपयांची फी आणि डोनेशन उकळणाऱ्या या संस्थाचालकांना विद्यार्थ्यांच्या जीवाची कोणतीही पर्वा नाही. कॉलेजच्या वेळेत आमच्या मुली बाहेर कशा गेल्या? संस्थाचालक व प्राचार्य या निष्काळजीपणाला जबाबदार आहेत,” असा संताप व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांनी संस्थाचालकांवर तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि संपूर्ण कॉलेज प्रशासनाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.(क्रमशः)