🔥वुशू शिस्त आणि बचावात्मक कौशल्यावर भर देणारा खेळ : मोहन अग्रवाल.
🔥 वर्धा जिल्ह्यातील वुशू खेळाडूंचा गुणगौरव सोहळा संपन्न.
वर्धा -/वुशू हा एक आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक खेळ आहे. हा खेळ आशियाई क्रीडा स्पर्धांचा एक भाग सुद्धा आहे. या खेळामुळे शरीराची लवचिकता ताकद, संतुलन आणि मानसिक एकाग्रता वाढण्यास मदत मिळते. या खेळामधून मुले स्वतःचे विश्व तयार करतात. स्पर्धात्मक खेळ हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत गरजेचे आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात मुलांनी प्रत्यक्ष वस्तू हाताळून खेळणे नवीन काहीतरी घडवणे जास्त महत्त्वाचे आहे.
पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांमधील स्पर्धात्मक आणि कलात्मक गुण ओळखून त्यांना अशा खेळासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. वुशू शिस्त आणि बचावात्मक कौशल्यावर अधिक भर देणारा खेळ आहे. असे मत वर्धा जिल्ह्याचे ज्येष्ठ समाजसेवी मोहनबाबू अग्रवाल यांनी व्यक्त केले.
ते 4 एप्रिल रोजी संत गजानन महाराज देवस्थानच्या सभागृहात वुशू स्पोर्ट्स असोसिएशन वर्धा द्वारा आयोजित गुणगौरव सोहळ्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
यावेळी मंचावर स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे संरक्षक इमरान राही, शायनिंग स्टार स्कूलचे संचालक समीर शेंडे, एकलव्य मार्शल आर्ट अकॅडमीचे संचालक पवन तिजारे, श्री संत गजानन महाराज संस्थेचे सचिव नानाजी पहाडे, कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे सचिव शिहान मंगेश भोंगाडे व मुख्य आयोजक वुशू स्पोर्ट्स असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष निलेश राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
खेळ खेळणारी मुले केवळ त्यांच्या वयाच्या मुलांशीच नव्हे तर संघातील मोठ्या आणि लहान खेळाडूंशी, प्रशिक्षकांशी, क्रीडा अधिकाऱ्यांशी संवाद साधायला शिकतात त्यांना नवीन मित्र बनवण्याची संधी मिळते. ही संवाद आणि सामाजिक कौशल्ये त्यांना भविष्यातील नातेसंबंध आणि करिअरमध्ये मदत करतात अशी भावना इमरान राही यांनी व्यक्त केली.
नुकत्याच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी मध्ये पार पडलेल्या युनिव्हर्सिटी वुशू चॅम्पियनशिप मध्ये वुशू स्पोर्ट्स असोसिएशन वर्धा जिल्ह्याच्या खेळाडूंनी मुख्य प्रशिक्षक निलेश राऊत यांच्या मार्गदर्शनात आपापल्या कॉलेजमधून प्रवेश निश्चित करून आपल्या उत्कृष्ट कलेचे प्रदर्शन करून सांडा क्रीडा प्रकारात देवळी येथील कु. स्नेहा मडकाम प्रथम स्थान तर तावलू या क्रीडा प्रकार मध्ये अभिषेक सोनवणे यांनी प्रथम प्राप्त करून जम्मू येथे होणाऱ्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी वुशू चॅम्पियनशिप करिता आपले स्थान निश्चित केल्याबद्दल तसेच वुशू खेळात प्राविण्य प्राप्त करून 5% खेळाडू आरक्षण प्राप्त करणारे प्रेम वाघमारे यांची नुकतीच गोंदिया येथे पोलीस दलात निवड झाल्याबद्दल या सर्व खेळाडूंना मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व वृक्ष देऊन सन्मान सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना वुशू स्पोर्ट्स असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे सचिव प्रणय विटणकर, संचालन कू. रुचिका टेंबरे तर आभार सेन्साई समीर साहू यांनी मानले.