🔥तहसीलदार सेलू यांना निवेदन सादर.🔥व्यवस्थापक वायकर यांची ग्राहकांशी असभ्य वर्तवणूक.
सिंदी (रेल्वे) -/येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाने शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यासाठी 25 हजाराची लाच मागितली. परंतु, लाचेची रक्कम न दिल्याने मानसिक त्रास देत शैक्षणिक कर्ज जाणूनबुजून कमी करून फसवणूक करणाऱ्या तसेच ग्राहकांशी गैर वर्तवणूक करणाऱ्या शाखा व्यवस्थापक मयूर वायकर यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी भीमराव फुलमाळी यांनी तहसीलदार मलिक विराणी यांना सोमवारी 30 सप्टेंबर रोजी निवेदनातून केली आहे.
भीमराव फुलमाळी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा सिद्धांत भिमराव फुलमाळी याला पी.जी.डी.एम. या कोर्स करीता आय.आय.ई.बी.एम. पुणे या कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला. त्याकरिता ८,०५,०००/- रूपये शुल्क भरायचे होते. परंतु, फुलमाळी एवढी मोठी रक्कम एकावेळेस भरू शकत नसल्यामुळे त्यांनी शैक्षणिक कर्जासाठी बँक ऑफ इंडीया शाखा सिंदी (रेल्वे) येथे रितसर अर्ज केला. यावेळी बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक यांनी फुलमाळी यांना कोणते काम करता असे विचारले असता ऑटो चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो असे सांगितले. त्यावेळी वायकर म्हणाले की, तुम्ही हे कर्ज परत करू शकणार नाही, तुम्ही कोणत्या जातीचे आहात? असे अनेक प्रश्न फुलमाळी यांना विचारले असता एस.सी. (महार) आहो असे सांगीतले. त्यावेळी वायकर म्हणाले की, तुम्ही मुलाला कशाला शिकविता सरकारने नोकऱ्या बंद केल्या आहेत, शिकुन काही उपयोग नाही, मुलाला एखादा ऑटो घेऊन द्या, असा सल्ला शाखा व्यवस्थापक वायकर यांनी दिला. फुलमाळी यांनी स्वतःच्या परिस्थितीची जाणीव करून मुलाच्या शैक्षणिक कर्जासाठी विनंती केली. त्यावर वायकर म्हणाले की, जर तुम्हाला हे कर्ज लवकर पाहीजे असेल तर मला २५ हजार रूपये द्यावे लागेल. त्यावर फुलमाळी म्हणाले की, एवढे रूपये माझ्याकडे नाही असे म्हणतात २० हजार द्या मी तुमचे कर्ज मंजूर करून देतो. परंतु, फुलमाळी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने बँकेचे व्यवस्थापक मयूर वायकर हे संतापले व फुलमाळी यांच्यासोबत अभद्र व्यवहार करून शिवीगाळ केली. एवढेच नाही तर बँकेतून हाकलून देईल अशी दमदाटी देत अर्वाच्य भाषेचा वापर केला.
सदर कर्ज मिळण्यासाठी दोन महिन्यांपासून शाखा व्यवसथापक हे टाळाटाळ करीत होते. शेवटी फुलमाळी यांना मानसिक त्रास देत ८,०५,०००/- रूपये शैक्षणिक कर्ज न देता जाणूनबुजुन ७,११,०००/- रूपयांचेच कर्ज मंजूर केले. परंतु उर्वरीत ९४,०००/- रुपये शुल्क भरण्याचे संकट फुलमाळी यांचावर ओढवले. सर्वांनाच शैक्षणिक कर्ज कॉलेजच्या कोटेशन प्रमाणे मंजूर केले आहे व तसा शासनाचा उपक्रम सुद्धा आहे. परंतू, व्यवस्थापकाने ही परिस्थिती फुलमाळी हेतूपुरस्सर आणली असा आरोप फुलमाळी यांनी केला आहे.
बँकेचे व्यवस्थापक वायकर शाखेत येणाऱ्या ग्राहकांसोबत नेहमीच अश्याप्रकारचा अभद्र व्यवहार करताना दिसतात. करिता लाचेची मागणी करून मानसिक त्रास देणाऱ्या या शाखा व्यवस्थापकावर योग्य ती कार्यवाही करावी. तसेच त्यांची हकालपट्टी करून ग्राहकांशी सौजन्याने वागणारा नविन व्यवस्थापक येथे रुजू करावा अशी मागणी भीमराव फुलमाळी यांनी तहसीलदार सेलू मलिक विराणी यांना निवेदनातून केली आहे.
🔥शाखा व्यवस्थापक वायकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
या संदर्भात बँक ऑफ इंडिया सिंदीचे शाखा व्यवस्थापक मयूर वायकर यांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर १ व २ ऑक्टोबर रोजी चार ते पाच वेळा संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांचे याप्रकरणी मत जाणून घेता आले नाही.