सेलू -/शहरात बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास एकच खळबळ उडाली. शहराबाहेरील सिंदी सहकारी खरेदी विक्री सोसायटीच्या सुरक्षा भिंतीलगत बिबट्या दिसल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बघ्यांची गर्दी वाढत असतानाच बिबट्या सैरभैर झाला आणि शहराकडे धाव घेतल्याने भीतीचे सावट गडद झाले.
वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक दिनेश उईके व पोलीस पथक आपल्या संपूर्ण ताफ्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत . मात्र नागरिकांची आरडाओरड आणि वाढती गर्दी पाहून बिबट्या अधिकच चंचल झाला. तो विद्याभारती कॉलेज, गजानन नगरी, ईश्वर नगरी, न्यायालय परिसर आणि गुडशेफर्ड शाळा परिसरात दिसल्याच्या चर्चांनी नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकवला.
दरम्यान, वनविभागाने बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले होते. सायंकाळपर्यंत त्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न अपुरे ठरत असतानाच रात्री उशिरा वर्धा-नागपूर महामार्गालगत विद्याभारती कॉलेज शेजारील ‘वाघमारे’ यांच्या शेतातील मका पिकात बिबट्या दडून बसल्याची चाहूल लागली.
यानंतर वनविभाग व पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचला. अखेर रात्री नऊच्या सुमारास सहा तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. या कारवाईदरम्यान गृहरक्षक दलातील एका कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, बिबट्या पकडण्याचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी काही अतिउत्साही नागरिकांनी सुरक्षेची तमा न बाळगता गर्दी केली. पोलिसांनी जमाव पांगवताना किरकोळ गोंधळ उडाला; काही जण एकमेकांच्या पायात पाय अडकून पडल्याचेही सांगितले जाते.
सहा तास शहरात एकच चर्चा.! “बिबट्या कुठे आहे?” अखेर तो जेरबंद झाल्याची बातमी समजताच सेलूकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वनविभागाच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.