साक्षगंधापूर्वी भावी वरासह सात जणांना ‘फूड पॉयझन’

0

प्रतिनिधी/ वर्धा :

साक्षगंध असल्याने भावी वराकडील मंडळी बाजारात खरेदी करण्यास गेली होती. त्यांनी पत्रावळी चौकात असलेल्या अंबिका नामक हॉटेलमध्ये नाश्ता करुन दही कलाकंद खाल्ले. मात्र, रात्री अचानक उलट्या आणि हागवण लागल्याने एकाच परिवारातील पाच सदस्यांसह इतर तिघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात मध्यरात्री दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी फूड पॉयझन झाल्याचे सांगितल्याने, याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली असून अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने दुपारी हॉटेलवर कारवाई सुरु होती. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्यांमध्ये विनय नाडे (२१), विशाल पात्रे (५०), नितीन पात्रे (२१), आशा पात्रे (५२), दक्ष पात्रे (०५), प्राची श्रावण शेंडे, अनुप आनंद शेंडे, लता राजेंद्र शेंडे यांचा समावेश आहे.

विनय नाडे याचे ५ जानेवारी बुधवारी साक्षगंध असल्याने खरेदी करण्यासाठी सर्व मंडळी मंगळवारी बाजारात गेली होती. खरेदी करुन थकल्यावर आठही जण पत्रावळी चौकात असलेल्या अंबिका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यास थांबले. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास सर्वांनी नाश्ता करुन दही कलाकंद खाल्ले. सर्व मंडळी घरी गेल्यावर रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक पोटात दुखू लागले आणि उलट्या आणि हागवण सुरु झाली. दरम्यान सर्वांना तत्काळ ऑटोत बसवून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता त्यांना फूड पॉयझन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबतची तक्रार शहर पोलिसात दाखल करण्यात आली असून बुधवारी दुपारी अंबिका हॉटेलमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी कारवाई केली. पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!