हिंगणघाट येथे मरहूम कवि आरिफ काझी सर यांच्या स्मरणार्थ २ मार्च रोजी श्रद्धांजली सभा..

0

🔥हिंगणघाट येथे मरहूम कवि आरिफ काझी सर यांच्या स्मरणार्थ २ मार्च रोजी श्रद्धांजली सभा.

हिंगणघाट -/ शहरातील सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी, शायर व आदरणीय शिक्षक मरहूम आरिफ काझी सर यांच्या स्मरणार्थ साहित्य रत्न मंच, हिंगणघाट यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, दिनांक २ मार्च २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता जी. बी. एम. एम. हायस्कूल, हिंगणघाट येथे आयोजित करण्यात आला आहे.

मरहूम आरिफ काझी सर यांनी आपल्या लेखणीतून, विचारातून व अध्यापनातून अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. त्यांनी साहित्य व शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देत समाजामध्ये साहित्यिक जाणीव जागृत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने व कार्याने हिंगणघाटसह संपूर्ण परिसरात एक वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.

या श्रद्धांजली सभेस प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध हास्य अभिनेते सुनील पाल उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्येष्ठ समाजसेवक व कवी इमरान रही यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात साहित्यिक डॉ. शांतिलाल कोचर “गोल्डी” हे असतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. इब्राहिम बख्श आझाद हे करणार आहेत.

या कार्यक्रमात अनेक मान्यवर कवी व शायर आपल्या काव्यरचनांद्वारे मरहूम आरिफ काझी सर यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. यामध्ये अब्दुल अमानी कुरेशी, मंजीद बेग मुगल शहजाद, मुबली लाहोटी, डॉ. रवि भालेराव, दामोदर वानखेडे, कविता बैस अब्दुल कदीर बख्श तसेच इतर साहित्यप्रेमी सहभागी होणार आहेत.

आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले की, हा कार्यक्रम केवळ श्रद्धांजली अर्पण करण्यापुरता मर्यादित नसून, मरहूम आरिफ काझी सर यांच्या महान व्यक्तिमत्त्वाला अभिवादन करण्याचा एक प्रयत्न आहे. त्यांच्या साहित्यिक वारशाचे जतन करून तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हेतू या कार्यक्रमामागे आहे.

साहित्य रत्न मंच, हिंगणघाट यांनी सर्व साहित्यप्रेमी, कवी, शायर तसेच नागरिकांना विनंती केली आहे की, त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली सभेला यशस्वी करावे व मरहूम आरिफ काझी सर यांच्या स्मृतीस अभिवादन करावे.

       ईकबाल पहेलवान                साहसिक News-/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!