🔥हिंगणा सहकारी कार्यालयात शिस्तीचा बोजवारा? वेळेवर न उघडणारे कार्यालय, भ्रष्टाचाराला खतपाणी!
हिंगणा -/हिंगणा येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका कार्यालयात प्रशासनाची शिस्तच हरवली की काय, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार कार्यालय सकाळी १० वाजता सुरू होणे बंधनकारक असताना अनेक वेळा कार्यालय उशिरा उघडले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सभासद व सामान्य नागरिक विविध कामांसाठी कार्यालयात येतात; मात्र संबंधित अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर नसल्यामुळे लोकांना तासन्तास वाट पाहावी लागत आहे. परिणामी नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या मते, कामकाजात जाणूनबुजून विलंब करून काही ठिकाणी गैरप्रकार व भ्रष्टाचाराला वाव दिला जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. जर ही परिस्थिती अशीच सुरू राहिली तर सहकार क्षेत्रातील कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नागपूर श्री. अजय कडू यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे त्यांची मीटिंग सुरू असतानाही त्यांनी तत्काळ मोबाईल उचलून माहिती ऐकून घेतली, यावरून त्यांच्या कामातील तत्परता दिसून आली.
तसेच सदर बाबीची माहिती व्हॉट्सअॅपद्वारे पाठविल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित सहाय्यक निबंधकांना तात्काळ सूचना दिल्या आहेत. त्यांनी संदेशाद्वारे कळविले की, “या संदर्भात संबंधित सहाय्यक निबंधकांना सूचना देण्यात आल्या असून आवश्यक कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात आले आहेत.”
त्यामुळे आता या प्रकरणाची प्रत्यक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.