🔥१५ ऑगस्टच्या आनंदमय वातावरणात हिंगणघाटला काळीज पिळवटून टाकणारी घटना; तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू
हिंगणघाट -/ स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी हिंगणघाट शहरात सर्वत्र देशभक्तीचा जल्लोष आणि आनंदाचे वातावरण असतानाच सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली.आज सकाळी सुमारे ९.३० वाजता बिडकर कॉलेज ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजदरम्यान हंसा ट्रॅव्हल्स आणि ॲक्टिव्हा दुचाकीचा भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, ॲक्टिव्हावरून प्रवास करणाऱ्या तीन विद्यार्थिनी ट्रॅव्हल्सच्या मागील चाकाखाली आल्याने या भीषण दुर्घटनेत तिन्ही विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला.मृत विद्यार्थिनींची प्राथमिक माहिती पुढीलप्रमाणे असल्याचे समोर आले आहे—
२) मिसबा जाविद शेख — रा. टाका मशीद परिसर, हिंगणघाट, वय १७ वर्षे, इयत्ता ११वी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज.
३) समृद्धी धामे — वय १७ वर्षे, इयत्ता ११वी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघात नेमका कशामुळे झाला, ॲक्टिव्हा आणि हंसा ट्रॅव्हल्सची धडक कशी झाली, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण, देशभक्तीपर कार्यक्रम आणि उत्साहाचे वातावरण असताना तीन तरुण विद्यार्थिनींच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
अवघ्या १६-१७ वर्षांच्या विद्यार्थिनींचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण हिंगणघाट शहर शोकसागरात बुडाले आहे.
अपघातातील मृतांची व घटनेची अधिकृत माहिती पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.