🔥२५ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या दो अवधूतवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या,पोलीस कोठडीत दोघांची रवानगी.
यवतमाळ -/ शहरातील अवधूतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका २५ वर्षीय तरुणाची जुन्या वादातून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमोल संगीत खडसे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत तीनपैकी दोन मुख्य आरोपींना अवघ्या काही तासांत अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
फिर्यादी सौ. शारदा संगीत खडसे (वय ४५, रा. आंबेडकर नगर, यवतमाळ) या आपल्या कुटुंबासह सेजल रेसिडेन्सी, बौद्ध सत्व शाळेजवळ भाड्याच्या घरात राहतात. त्यांचा मुलगा अमोल खडसे याचे आरोपींशी जुन्या कारणावरून वाद सुरू होते. याच वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी कट रचला होता. १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळ च्या सुमारास, आरोपींनी अमोलला गाठले. जुन्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले आणि रागाच्या भरात आरोपींनी धारदार चाकूने अमोलवर सपासप वार केले. या हल्ल्यात अमोल गंभीर जखमी झाला आणि अतिरक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुड्डू ऊर्फ नितीन त्र्यंबकराव गजभीये (वय ४५, रा. जुना उमरसरा), सतिष त्र्यंबकराव गजभीये (वय ३८, रा. जुना उमरसरा),कुणाल त्र्यंबकराव गजभीये (वय ४४, रा. जुना उमरसरा) अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३, ३(५) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अवधूतवाडी पोलीस निरीक्षकांनी तात्काळ तपास चक्रे फिरवली. आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली होती.
पोलीस उपनिरीक्षक सुरज जगताप आणि त्यांच्या डी.बी. पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली. या मोहिमेत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले यामध्ये
सतिष त्र्यंबकराव गजभीये (३८ वर्षे)
कुणाल त्र्यंबकराव गजभीये (४४ वर्षे)
दोन्ही आरोपींना आज दि. १४ मार्च २०२६ रोजी पहाटे ४:२४ वाजता रितसर अटक करण्यात आली आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. हत्येमागे केवळ जुना वाद होता की आणखी काही ठोस कारण होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.
शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. भरवस्तीत झालेल्या या खुनाच्या घटनेने यवतमाळमध्ये गुन्हेगारांवरील पोलिसांच्या धाकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले, तरी अवधूतवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींना जेरबंद करून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.