अखेर वर्धा सायबर पोलिसांनी उकलला बनावट नात्यातील गुंता
byसाहसिक न्युज 24
प्रमोद पाणबुडे/वर्धा:
रिश्ते गाईड डॉट कॉम साईटच्या माध्यमातून बनावट प्रोफाईल तयार करून लोकांची आर्थिक फसवणूक करणार्या बनावटी कॉल सेंटरवर सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून 1 लाख 83 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या नावाची रिश्ते गाईड डॉट कॉम साईटवर बनावटी प्रोफाईल बनवून त्यामध्ये चुकीची माहिती भरुन ती प्रोफाईल नमूद साइटवर अपलोड केली. तसेच फिर्यादीची बदनामी करुन फसवणूक केल्याची तक्रार 1 जुलै रोजी रामनगर पोलिसात करण्यात आली होती. तक्रारीवरून माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याची सायबर सेलद्वारे तत्काळ दखल घेऊन तांत्रिक माहिती काढण्यात आली. दरम्यान, रामनगर पोलिस स्टेशन हद्दीतील गौरक्षण वार्ड, येथे अग्रवाल यांच्या घरी भाड्याने सुरू असलेल्या रिश्ते गाईड डॉट कॉम या विवाह संस्थेवर छापा टाकण्यात आला.
यावेळी तुषार कोल्हे (24) रा. प्लॉट नं. 54, स्नेहनगर छत्रपती चौक, नागपूर याने रुचिका खोब्रागडे (24) रा. आमगाव जंगली, ता. सेलू, जि. वर्धा हिच्यासोबत संगनमत करून रिश्ते गाईड डॉट कॉम विवाह संस्थेची फ्रेन्चायजी घेतली. तसेच सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मुला-मुलींचे फोटो व वैयक्तीक माहितीची चोरी करीत त्यांची बनावट प्रोफाईल तयार करतात, अशी माहिती उघड झाली. प्रोफाईलमध्ये बनावट मोबाईल क्रमांक टाकुन अपलोड करतात. ज्या ग्राहकाला पसंती आली त्यांना खोटी माहिती पुरवून स्वत:च्या फायद्याकरीता त्यांच्याकडून पैसे उकळतात. सदर काल सेंटरचे अनेक ग्राहक असून मोबाईल फोनव्दारे माहितीची देवाण-घेवाण करण्याकरिता 6 महिला कामाला ठेऊन लग्न जुळवून देतो, अशी बतावणी करीत लोकांची आर्थिक फसवणूक तसेच बनावटी प्रोफाईल तयार करुन बदनामी केल्याचेही या कारवाईत समोर आले. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून बनावटी कॉल सेंटर चालविण्याकरीता लागणारे साहित्य 7 साधे मोबाईल, 4 अँड्राईड मोबाईल, रोख 38 हजार 490 रुपये, चार संगणक संच, मोबाईल चार्जर, 21 रजिस्टर, बँकेचे चेकबूक व इतर साहित्य असा 1 लाख 83 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. प्रशांत होळकर, अपर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशाप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, बालाजी लालपालवाले, गजानन लामसे, निलेश कट्टोजवार, यशवंत गोल्हर, दिनेश बोथकर, विशाल मडावी, अनूप कावळे, अक्षय राऊत, रितेश शर्मा, राजू जयसिंगपुरे, अंकित जिभे, महिला पोलिस अंमलदार शाहिन सय्यद, स्मिता महाजन यांनी केली.